Sunday, June 16, 2024

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा: औरंगाबादेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ध्वजारोहण ◆मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात 8 मंत्र्यांनी केले ध्वजारोहण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ औरंगाबाद- मराठवाड्याचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन असणारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबादेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय ध्वजारोहण केले. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात 8 विविध मंत्र्यांनी ध्वजारोहण केले. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे शासकीय ध्वजारोहण होत असते. पण पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्याने विविध 8 मंत्र्यांनी ही जबाबदारी पार पाडली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त्‍ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री  हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्यासह, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या.

नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, आमदार अमर राजुरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्वातंत्र्य सैनिक विष्णुपंत पुराणिक, वारसा पत्नी गयाबाई करडीले, रुक्मीदेवी शर्मा, सुर्यकांताबाई गनमुखे, बालाजी जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव सुरू होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्याला आणखी 13 महिने स्वातंत्र्याची वाट पहावी लागली. निजामाशी संघर्ष करावा लागला. अनेकांना यात हौतात्म्य आले. निझामाने भारतात येण्यास नकार दिल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली दिलेला मराठवाडा मुक्तीचा लढा हा सर्वार्थाने व्यापक लढा आहे. याचे वेगळे मूल्य आहे. मराठी, तेलगू, कन्नड असा मातृ भाषेतून शिक्षणाला विरोध करून ऊर्दूतून शिक्षणासाठी सक्ती केल्याने स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याची बिजे पेरली. निझामाच्या अत्याचाराची परिसीमा वाढली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो-पोलीस ॲक्शन करण्याची वेळ निझामाने आणली. पोलीस कारवाईमुळे हा प्रांत भारतात विलीन झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तीचे मोल अधिक आहे. याचबरोबर मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचेही मोल अधिक आहे. हे स्वातंत्र्य स्वैराचारात रुपांतरीत होणार नाही याची काळजी घेऊन स्वातंत्र्यातील समता, बंधुता याचे जे मूल्य आहे ते आपण प्राणपणाने जपू असा संकल्प घेण्याचा आजचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नांदेडचे भूमिपुत्र शहिद सहायक कमांडेट सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या अवलंबितास एक कोटी रूपयांचा धनादेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात देण्यात आले. याप्रसंगी नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या नांदेड जिल्हा पुस्तीकेचे विमोचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या पोषण मार्गदर्शिचे विमोचन करण्यात आले. जिल्हा परिषद नांदेड कडून तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा या घडीपुस्तीकेचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या योजनांचे व रानभाजी पाककृती पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. परेड कमांडर विजयकुमार धोंगडे यांच्या पथकाने शहीद स्मारकाला जनरल सॅल्युट सलामी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी व नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले.

लातूर येथे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शासकीय ध्वजारोहण केले. यावेळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हिंगोली येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

परभणी येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राजगोपालचारी हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

उस्मानाबाद येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली.

जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!