ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ नुकसानग्रस्त पाहणी दरम्यान घडलेला प्रकार
नांदेड- “मस्ती करु नको, एका मिनिटांत मस्ती उतरवीन” असे म्हणत शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना तंबी दिली आहे. त्यांच्या या तंबीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान हा प्रकार घडला आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी सोमवार दि. २४ जुलै रोजी सायंकाळी माहूर तालुक्यातील काही गावांचा आणि शेतशिवाराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींमुळे पारा चढलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांना धारेवर धरले. तू काय ब्रिटीशांची औलाद आहेस का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का? असे म्हणत त्यांनी तहसीलदारांना झापणे सुरू केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहूरच्या नुकसानीबाबत माहिती घेत असताना त्यांनाही तू तुझाच शहानपणा शिकवतोस का? अशा विविध कारणावरून खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांना सुनावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आपत्कालीन परिस्थितीबाबत माहिती घेण्याकरीता किवा देण्याकरीता माहुरचे तहसीलदार किशोर यादव ह्यांना पत्रकार, विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरीकांचे फोन केल्यावर, ते कधीही फोन उचलत नाहीत. नागरीकांशी संपर्क ठेवत नाही व सर्वाशी उध्दट वागतात, सातत्याने अपमानजनक वागणूक देणे, कठीणप्रसंगी व एरवीही फोन न घेणे, शासकीय योजनाची माहिती सार्वजनिक न करणे आदी असंख्य तक्रारी या दौऱ्यादरम्यान खा. हेमंत पाटील यांच्याकडे करण्यात आल्या. यातच पाहणीदरम्यानही तहसीलदार किशोर यादव हे असेच काहीतरी बोलले आणि खासदारांचा पारा चढला. “निट रहा, निट वागा… मस्ती येऊ देऊ नका, एका मिनटात मस्ती उतरवीन… लंडनहुन शिकून आलात का, इंग्रजाची औलाद आहात का… तुम्हाला जास्त मस्ती व चरबी आहे का? शिवसेनेचा हिसका काय असतो दाखवू का? अशी तंबी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खासदार पाटील यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील या तालुक्यात शुक्रवार दि. २२ जुलैच्या मध्यरात्री एक वाजेपासून सतत ७ तास मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफूटी सदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर पैनगंगा नदीच्या पुलावर दहा फूट वरून पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला होता. शेकडो एकर शेतजमिन खरडून गेली, तर हजारो एकर शेतजमिनीवरील खरीप पीकेसुद्धा पाण्याखाली गेली. तसेच नदी व नाल्याचे पाणी घरात शिरल्याने अनेक घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याची मोठी हानी झाली. याशिवाय दुकान आणि गोदामात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले. टाकळी येथे एकाच कुटुंबातील ३ नागरीक पाण्यात अडकले होते. तब्बल २०० ते ३०० मी. मी. पाणी पडल्याचा अंदाज आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर खा. हेमंत पाटील हे या भागाच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. खा. पाटील यांनी माहूर तालुक्यातील सातघरी, शेकापूर, लांजी, टाकळी, मच्छिन्द्रपार्डी या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाला त्वरित अहवाल पाठवा अशा सूचना तहसीलदार माहूर यांना केल्या.
यावेळी योगी श्यामबापू भारती महाराज, तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, युवासेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे, हनुमंत मुंडे, सुरज सातूरवार, साई पापेलवार, समीर जायभाये यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻