ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
भोकर (जि. नांदेड)- तिकडे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर सीमाप्रश्नावरून मोठा वाद सुरू असताना इकडे नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर मात्र दोन्हीकडील सीमावासीयांचा एकत्रितपणे जुगाराचा डाव रंगत असल्याचे उघडकीस आले आहे.महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या जुगार अड्डयावर नांदेड जिल्ह्याच्या भोकर पोलिसांनी धाड टाकून दोन्ही राज्याच्या अनेक जुगाऱ्यांना अटक केली आहे.
महाराष्ट्र – तेलंगणा राज्य सिमेजवळ भोकर तालुक्यातील किनी जवळ एका बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली. भोकर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत १७ जुगाऱ्यांसह एकूण १५ लाख ८२ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मीनर्सिम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पो.उप.नि.दिगंबर पाटील, प्रल्हाद बाचेवाड, पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे, चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड, प्रकाश वावळे व महिला पोलीस नायक सिमा वच्छेवार आदींच्या पोलीस पथकाने इतर पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन किनी गावच्या बंद राईस मिलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत नागरिक व बंद राईस मिलचे मालक हे सर्वजण पत्त्यांचा जुगार खेळताना व खेळवितांना घटनास्थळी मिळून आले.
या जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत जुगाऱ्यांकडून रोख १ लाख ६०० रुपये, १६ किमती मोबाईल, ७ दुचाकी व १ चारचाकी वाहन आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १५ लाख ८२ हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जुगाऱ्यांना भोकर पोलिसांनी अटक केली आहे. जुगार अड्डा चालविणाऱ्याचे नाव संजीव रेड्डी रा.किनी ता.भोकर असे असल्याचे सांगण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य १६ जुगाऱ्यांची नावे: संतोष खलशे रा. दहेगाव, गणेश कदम रा. निघवा, श्रीनिवास जाधव रा.रंजणी, राजकुमार बालिजापल्ली, आनंद राठोड रा. डोडरणा ” तांडा, देवाला अंकाम रा.भोशी, मल्लेश नारडे रा. कुबेर, बालाजी घोसालवाड रा. बोळासा, विठ्ठल गोपवाड रा.गोडसरा, देविदास येनकुसाब रा.निघवा, गजराज पळसे रा. पळशी, सत्यनारायण शिंदे रा.दहेगाव, सुरेश ठाकूर रा.पळशी, वरील सर्वजण ता.मुधोळ जि.निर्मल तेलंगणा राज्य येथील आहेत. तर श्रीनिवास कदम रा.लगळूद, गोविंद जाधव रा.महागाव, दिलीप जाधव रा. लगळूद हे तिघेजण ता.भोकर जि.नांदेड येथील आहेत.
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या बंद राईस मिलच्या मालकासह वरील १७ जुगाऱ्यांविरुद्ध जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.हे.कॉ.भीमराव जाधव हे करीत आहेत. घटनास्थळापासुन काही जुगाऱ्यांनी पळ काढल्याचे सांगण्यात येते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻