Saturday, June 22, 2024

माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा शिवबंधनात; मुंबईत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड: हदगाव- विधानसभा मतदारसंघात सतत पंधरा वर्ष आमदार तर पाच वर्षे हिंगोली मतदारसंघाचे खासदार म्हणून शिवसेनेची भगवी पताका फडकविणारे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी घरवापसी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, भुजंग पाटील, प्रकाश मारावार, युवा सेनेचे सहसचिव माधव पावडे यांची उपस्थिती होती.

हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यावर वरिष्ठ स्तरावरून सुभाष वानखेडे यांना शिवसेनेत प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी पुढाकार घेत सुभाष वानखेडे यांना पुन्हा शिवबंधनात बांधले.

हदगाव मतदारसंघात १९९५ ते २००९ आमदार तर २००९ ते २०१४ हिंगोलीचे खासदार म्हणून सेनेचा भगवा खांद्यावर घेतलेले सुभाष वानखेडे हे २०१४ मध्ये हिंगोलीमधून केवळ एक हजार ६३२ मतांनी लोकसभेला पराभूत झाले. हा पराभव स्वकीयांनी घडवून आणला होता. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा लोकांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये असा त्यांनी त्यावेळी आग्रह धरला होता. परंतु वरीष्ठ स्तरावरून शिवसेना- भाजपाची युती तुटल्याने पक्षाच्यावतीने सर्वत्र उमेदवार उभे करण्यात आले. त्यात वानखेडे यांना पराभूत करणाऱ्यांना उमेदवारी दिली म्हणून त्यांनी अचानक नांदेड उत्तर विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी नाकारून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान मधल्या काळात त्यांनी भाजप वाढवण्यासाठी पण प्रयत्न केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा त्यांच्या एके काळचे खंदे समर्थक हेमंत पाटील यांनी पराभव केला. त्यांचे काँग्रेसमध्ये फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी कुठेही फारसा सार्वजनिक सहभाग नोंदवला नव्हता. पालकमंत्री अशोकराव चव्हाण वगळता त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींशी जुळत नव्हते, परिणामी त्यांनी अलिप्त धोरण स्वीकारले होते. मागील काही दिवसांपासून वानखेडे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश होणार अशा चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी हा प्रवेश केला आहे.

दरम्यान कळमनुरीचे आमदार संतोष बांगर व खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पोकळी भरून काढण्यासाठी त्याच तोडीचा नेता पक्षाला हवा होता व सुभाष वानखेडे यांनी पण गुरू पौर्णिमेला थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मेसेज करून अशा परिस्थितीमध्ये गुरू दक्षिणा देण्याची व पक्षाला वाईट काळात साथ देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे वरिष्ट पातळीवरून सूत्र हलल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान बुधवार दि. २० जूलै रोजी सेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर, रवींद्र मिर्लेंकर, संपर्कप्रमुख आनंद जाधव, धुळे जिल्ह्यातील संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख आदींच्या उपस्थितीत सुभाष वानखेडे यांना मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!