Saturday, June 22, 2024

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आ.जवळगावकर, आ.हंबर्डे आदी 11 आमदारांना काँग्रेसने पाठविली शिस्तभंगाची नोटीस, कारवाईच्या शक्यतेने राज्यातील कॉंग्रेसमध्ये खळबळ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मतदानावेळी विधानसभेत उशिरा पोहोचल्याप्रकरणी नोटीस

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनाही नोटीस

आधी चर्चा होऊन मग मतदान होईल असे वाटल्याने उशीर- अशोक चव्हाण

मुंबई/ नांदेड- राज्यातील नवीन सरकारच्या विश्वासदर्शक ठराव मतदानावेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. मतदानावेळी सभागृहात अनुपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील दोन काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि आ.मोहनराव हंबर्डे व अन्य ६ आमदारांना काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले. त्यात पाहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदानासाठी व्हीप बजावला होता. विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी हजर राहणे अपेक्षित होते. पण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर हे त्यावेळी गैरहजर राहिले. पक्षाने त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी सभागृहाची दारे बंद करून घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार विधान भवनात पोहोचले पण त्यांना सभागृहात जाता आले नाही. परिणामी विश्वासदर्शक ठराव मतदानावेळी सभापती निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा महाविकास आघाडीच्या बाजूने ९ कमी मते पडली.

या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ”अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी, असे विधान केले होते. या घडामोडीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्टाचे प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

काँग्रेस नेतृत्वाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली असून गैरहजर असलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मतदानावेळी अनुपस्थित असलेल्या ११ पैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या न्यूयॉर्कला असल्यामुळे आणि जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने या दोन आमदारांनी उपस्थित राहू शकणार नसल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे हे दोन आमदार वगळता अन्य ९ आमदारांना पक्षाने नोटीस पाठविली आहे.

काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर पुढे कारवाईचीही शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे राज्यातील काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.

आधी चर्चा होऊन मग मतदान होईल असे वाटल्याने उशीर- अशोक चव्हाण
दरम्यान, विधानसभेत मतदानाला जाताना उशीर झाल्याबाबत कालच आ. अशोक चव्हाण यांनी आपले स्पष्टीकरण माध्यमांसमोर मांडले होते. स्पष्टीकरण देताना अशोक चव्हाण म्हणाले की, सभागृहात नेहमी चर्चा होऊन मतदान होते. तसेच आताही तसेच होईल असे वाटल्याने आम्ही काहीशा उशिराने म्हणजे अगदी तीन मिनिटांच्या उशिराने पोहोचलो. पण मतदान लगेच सुरू झाल्याने दरवाजे बंद झाले आणि आम्हाला आत जाता आले नाही. आम्हाला आत प्रवेश देण्याबाबत सभापतींनाही आम्ही लेखी विनंती केली होती, पण प्रवेश मिळाला नाही, असे आ. अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

बहुमत चाचणीसाठी अनुपस्थित आमदार :
अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
माधवराव पाटील जवळगावकर
मोहन हंबर्डे
धीरज विलासराव देशमुख
झिशान बाबा सिद्दीकी
कुणाल पाटील
राजू आवळे
शिरीष चौधरी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!