ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– माया, नेहा नावाच्या महिलांसह इतर पाच महिलांनी दामदुपटीचे आमिष दाखवून शाखा अभियंता महिलेला अडीच लाखाचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन ओळख निर्माण करून हॉटेल रेटिंग्ज व क्रिप्टो क्लब या साइटवरून शेअरिंग इकॉनॉमिचा टास्क देऊन दोन लाख 56 हजाराची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाच महिलांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आठ एप्रिल ते बारा एप्रिलच्या दरम्यान जैन मंदिर मालेगाव रोड व खरोसा ता. औसा, लातूर येथे घडला.
नांदेड शहरातील मालेगाव रोड प्रेमनगर, जैन मंदिर परिसरात राहणाऱ्या शाखा अभियंता अंकिता सुधाकर महाजन यांना त्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन हॉटेल रेटिंग्ज व क्रिप्टो ग्लोब या साइटवरून माया, नेहा, ध्वीन, सौमाल्या आणि शर्विना या पाच महिलांनी तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर कमिशन मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमी रकमेवर कमिशन दिले आणि त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला. ऑनलाइन जास्त पैसे मिळत असल्याने शाखा अभियंता असलेल्या अंकिता महाजन यांनी वेळोवेळी समोरून शेअरिंग इकॉनॉमीचा टास्क केल्यानंतर कमिशनपायी पैसे गुंतवले. यात 5 हजार, 55 हजार आणि एक लाख 96 हजार असा एकूण 2 लाख 56 हजार रुपयांचा टास्क त्यांना देऊन हा टास्क पूर्ण केल्यानंतर, काही वेळाने टास्क चुकला असे सांगण्यात आले. आणि गुंतवलेली रक्कम व कमिशन परत न करता अंकिता महाजन यांची ही ऑनलाईन फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंकिता महाजन यांनी हा प्रकार त्यांनी आपल्या घरी सांगितला. यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी अंकिता महाजन यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कलम 420, 34 भादविसह कलम 66 ( ड ) आयटी अक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रमेश वाघ करत आहेत.
उच्चशिक्षित असलेल्या व शासकीय सेवेत असलेल्या महिला अभियंता कमीशनपायी अधिकचे पैसे मिळत असल्याच्या अमिषाला बळी पडल्या. त्यांनी आपल्या जवळचे अडीच लाख रुपये गुंतवणूक केली. त्यामुळे अशा कुठल्याही वेबसाईटवरून पैशाचे दामदुपटीचे आमिष दाखविल्यास त्यांना वैयक्तिक माहिती देऊ नये, सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻