Saturday, July 27, 2024

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उद्या नांदेडमध्ये; शासन आपल्या दारी कार्यक्रम, शहरातील वाहतूक मार्गात बदल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र आराखडा

◆ योजनांच्या मेळाव्यासह आरोग्य तपासणी शिबीर

आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड- सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व भव्य “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उद्या, रविवार 25 जून रोजी दुपारी 1.30 वा. नांदेडमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अबचलनगर येथील भव्य मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने हा भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे. शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती जोपर्यंत लाभार्थ्यांना होत नाही तोपर्यंत त्या योजनांप्रती लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासमवेत ग्रामपंचायत पातळीपर्यंत योजनांचा जागर पोहचावा या उद्देशाने नांदेड येथे भव्य प्रमाणात शासन आपल्या दारी याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातुन नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यांच्या मार्फत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून तर नांदेड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांशी समन्वय साधला गेला आहे. मनपा क्षेत्रातून 15 हजार, नगरपालिका क्षेत्रातून 10 हजार व ग्रामीण भागातून 20 हजार नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनाच्या या महामेळाव्यास 75 हजार नागरिक येवू शकतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले गेले आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत चारशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यादृष्टिने संपूर्ण नियोजन केले असून उष्णता व पावसाची शक्यता याबाबी विचारात घेवून भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूला शासकीय योजनांचे स्टॉल्स व प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या विभागाचा जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती देईल. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करुन ठेवण्यात आली आहे. आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रथमोपचार व्यवस्थाही तत्पर ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचता यावे यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सुमारे 100 अधिकारी व त्यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 25 जून 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने अबचलनगर मैदान नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ अबचलनगर मैदान नांदेड. दुपारी 3.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या दिवशी भरणारा उद्याचा आठवडी बाजार राहणार बंद
नांदेड शहरात रविवार 25 जून रोजी अबचलनगर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी रविवार 25 जून रोजी इतवारा/अबचलनगर भागात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच सदरील भागातील मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टिकोनातून अबचलनगर/इतवारा भागात भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. हा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार 26 जून 2023  रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

उद्या 25 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ

नांदेड येथे रविवार 25 जून रोजी अबचलनगर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

लोहा, कंधार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने भगतसिंग चौक-कौठा-एसपी ऑफीस-शिवाजी पुतळा-चिखलवाडी कॉर्नर-यात्री निवास या मार्गाने येतील.

धर्माबाद, उमरी येथून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. या तालुक्यातून येणारी वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास येथे थांबतील.

नायगाव, मुखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने चंदासिंग कॉर्नर-लातूर फाटा-जुना मोढा-अबचलनगर कमान येथून येतील.

किनवट, माहूर येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास-अबचलनगर कमान-फतेहसिंह मंगल कार्यालय येथे थांबतील.

सर्व शासकीय वाहने यांच्यासाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र (सीआरसी) येथे व्यवस्था केली आहे. ही वाहने देगलूर नाका-सीआरसी गेट क्र. 1 द्वारे बाफना फ्लाय ओहर मार्गे गेट क्र. 1 द्वारे प्रवेश करतील. मुदखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली असून ही वाहने देगलूर नाका-सीआरससी गेट क्र. 2 द्वारे प्रवेश आहे.

बिलोली, देगलूर, भोकर येथून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था बाबा पेट्रोलपंप, कापूस संशोधन केंद्रासमोर करण्यात आली आहे. ही वाहने देगलूर नाका मार्गे डावीकडे वळून आत प्रवेश करतील.अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर येथून येणारी वाहने खालसा हायस्कूल नांदेड येथे थांबतील. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-फ्लाय ओहर-म्युझीयम-हिंगोली फ्लाय ओहर खालून उजवीकडे वळून प्रवेश आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्यासाठी हिंगोली गेट मैदान नांदेड येथे थांबतील. पदाधिकारी खाजगी वाहने (चार चाकी व दुचाकी) यांच्या वाहनांची व्यवस्था हिंगोली गेट मैदान नांदेड येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!