ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड- तीन वेळा बदललेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा अखेर रद्द झाला अशी चर्चा सुरू होती. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली मुंबईत सुरू असून या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याची चर्चा होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यासाठी मुंबई येथील निवासस्थानाहून रवाना झाले आहेत. ते 5 वाजता नांदेडमध्ये पोहोचणार आहेत.
मुंबईत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यातील ही बैठक बराच वेळ चालली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यासाठी निवासस्थानाहून रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सुधारित दौरा देण्यात आला होता. यात आज दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटाला ते श्री गुरुगोविंद सिंग विमानतळ येथे विशेष विमानाने येणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतर दुपारी तीन ते तीन वीसपर्यंत सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेऊन त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेस भेट आणि राखीव. त्यानंतर सायंकाळी नांदेड उत्तर मतदार संघातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सायंकाळी मालेगाव रोडवर असलेल्या भक्ति लॉन्स येथील मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.
नांदेड येथून त्यांचा ताफा हिंगोलीकडे प्रयाण करणार आहे. भव्य कावड यात्रेस त्यांची उपस्थिती राहणार असून हिंगोलीच्या अग्रसेन चौक नांदेड नाका येथे आमदार संतोष बांगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गांधी चौक हिंगोली येथे आमदार बांगर यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधन करणार आहेत. त्यानंतर आमदार बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्म हाऊसला ते भेट देणार आहेत. रात्री हिंगोली येथून त्यांचा ताफा औंढा नागनाथकडे जाणार आहे. रात्री औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व रात्री औंढा नागनाथ येथून वसमत मार्गे मोटारीने नांदेड विमानतळाकडे येणार आहेत. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
या दौऱ्यातील वेळांमध्ये आता बदल होणार असून यातील काही कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता आहे.
मात्र यापूर्वी जाहीर झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये नांदेड शहरातील विविध विकास कामांचा आढावा तसेच पासदगाव येथील आसना पुलाचे भूमिपूजन आणि नांदेड- निळा रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन हे कामे त्यांनी आपल्या दौऱ्यातून वगळले आहेत. तसेच छत्रपती चौक येथील कार्यक्रमही रद्द केला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻