ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष, तालुकाप्रमुखही शिंदे गटात
◆ शिवसेनेकडूनही तात्काळ कारवाई, उमेश मुंडेंची हकालपट्टी
नांदेड- मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला हादरा बसला असून नांदेड ग्रामीणचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
आज व उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा असून ते नवी दिल्लीहून थेट नांदेडला येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शिवसेनेत मोठी फाटाफुट होत असल्याचे दिसून येत आहे. नांदेड ग्रामीणचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे आणि नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. हे दोन्हीही शिवसेनेचे पदाधिकारी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. खासदार हेमंत पाटील यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आज रात्रीच शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मावळत्या उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार, शिवसेना शेतकरी आघाडीचे प्रल्हाद इंगोले हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अजून काही प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
युवा सेनेमध्येही नाराजी
शिवसेना पाठोपाठ आता युवा सेनेमध्ये देखील नाराजीचा सुर पहावयास मिळत आहे. निष्ठवंतांना डावलल्याचा कारणावरून युवा सेनेच्या 30 ते 35 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच युवा सैनिकांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवारी युवा सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकारणीमध्ये निष्ठवंतांना डावलून पक्षात काम न केलेल्याना संधी दिली आहे, असा आरोप नाराज युवा सैनिकांनी केला आहे. राजीनामा दिला असला तरी इतर कोणत्याही गटात जाणार नसल्याचे या युवा सैनिकांनी सांगितले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पाठवला आहे.
शिवसेनेकडून कारवाई, उमेश मुंडेंची हकालपट्टी 👆🏻
उमेश मुंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच शिवसेनेकडून तात्काळ कारवाई करण्यात आली असून मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻