ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन महिलांना अनोळखी दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले. एका महिलेच्या गळ्यातील 47 हजार रुपयांचे तर दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील चाळीस हजारांचे गंठण जबरीने तोडून नेले. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या आनंदनगर ते भाग्यनगर रस्त्यावर दि. 20 एप्रिल रोजी सकाळी पाचच्या सुमारास संगीता माणिकराव पवार (वय 46) वर्षे राहणार शारदानगर ह्या आपल्या अन्य एका मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्या आनंदनगर ते भाग्यनगर रस्त्यावर मॉर्निंग वाक करत असताना सकाळी पाचच्या सुमारास पाठीमागून एका दुचाकीवरून अनोळखी तीन चोरट्यांनी येऊन संगीता पवार यांच्या गळ्यातील शोर्ट गंठण व मनी मंगळसूत्र असा एकूण 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरट्यांनी त्यांच्या तोंडाला व डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला होता. याप्रकरणी संगीता पवार यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू करत आहेत.
तर दुसर्या घटनेत याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल रोड नालंदा नगरकडे जाणाऱ्या शिवालय बिल्डिंगजवळ विद्या विनोद वाघमारे या महिलेला गाठून त्यांच्या गळ्यातील 44 हजार रुपयाचे शॉर्ट गंठण आणि मंगळसूत्र लंपास केले. विद्या वाघमारे ह्याही आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या पाठीमागून येवून चोरट्यांनी गळ्यातील गंठण आणि मंगळसूत्र लंपास केले. विद्या वाघमारे यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात अनोळखी तीन दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार रेडेकर करत आहेत. या दोन घटनांमुळे महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचे गुडमार्निंग पथक सक्रिय हवे
नांदेड शहरात लुटमारीच्या घटना मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. सराईत गुन्हेगारांवर वचक बसेल यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मात्र गुन्हेगार हे पाळत ठेवून गुन्हे करतात. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना, जेष्ठ नागरिकांना गाठून त्यांच्या किमती वस्तू पळविणे, वेळ प्रसंगी त्यांना धमकी देणे हे प्रकार सुरू झाले आहेत. गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांकडून गुड मॉर्निंग पथक कार्यरत असते सर्वच ठाण्याअंतर्गत सुरू असलेले गुड मॉर्निंग असणे गरजेचे आहे. गुड मॉर्निंग पथक सकाळी जर रस्त्यावर गस्तीवर असेल तर अशा घटनांना नक्कीच प्रतिबंध बसू शकतो.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻