Sunday, June 16, 2024

मोटारसायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला भीषण धडक: चिमुकल्यासह पती – पत्नी जागीच ठार, मुखेड तालुक्यातील अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मोटारसायकलने ट्रॅक्टर ट्रॉलीला भीषण धडक दिल्याने लहान मुलासह पती – पत्नी जागीच ठार झाले आहेत. ही दुर्घटना मुखेड तालुक्यातील नांदेड – बीदर राष्ट्रीय महामार्गावर बिहारीपूर गावाजवळ घडली आहे.

आपली कामे आटोपून मुखेडहून मुक्रमाबादकडे परत निघालेल्या शेख कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. बिहारीपुरजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने पती, पत्नी व लहान मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज गुरूवार दि.२३ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शेख मोहसीन शेख गणीसाब (वय ३०) हे पत्नी शेख फरीदा शेख मोहसीन (वय ३० वर्षे) व मुलगा शेख जुनैद शेख मोहसीन (वय ३ वर्षे) यांच्यासह (एम.एच.१४ आर.००४९) या दुचाकीने एका खासगी कामानिमित्त सकाळीच मुखेडला गेले होते. तेथील काम आटोपून नांदेड – बिदर या राष्ट्रीय महामार्गाने मुक्रमाबादकडे परत निघालेला असताना बिहारीपुर या गावाजवळ महामार्गाच्या कडेला नादुरूस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांची मोटारसायकलने जबर धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, यात तिघेही जागीच ठार झाले. गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेली ट्रॅक्टर ट्रॉली तीन फूट पुढे सरकली. यात शेख मोहसीन, त्याची पत्नी शेख फरीदा यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या लहान मुलाच्याही डोक्यावर व चेहऱ्यावर मोठी इजा झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील तिघांच्या झालेल्या या मृत्यूने मुक्रमाबाद शहरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती समजताच साहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातात मृत्यू पावलेल्या तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक चांद सय्यद, गोपनिय शाखेचे माधव मरगीलवार हेही उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!