ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर व परिसरात तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, दुचाकी चोरी असे गंभीर गुन्हे करून लूटमार करणारी टोळी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चार आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल, बारा दुचाकी, दोन तलवार, एक खंजर, एक कत्ती आणि नगदी रकमेसह सात लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचे दोन गुन्हे केल्याचे या चोरट्यांनी कबुली दिली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी दोन जबरी चोरीचे गंभीर गुन्हे घडले होते. 17 नोव्हेंबर रोजी कोहिनूर मिलजवळ तिघांना आरोपींनी अडवून चाकूने मारून त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर 18 नोव्हेंबरच्या रात्री भगवान बाबा चौक सिडको येथे रात्री साडेनऊच्या सुमारास पर्वता गणपती सुरेवाड यालाही चाकूने मारून त्याच्याकडून सात हजार रुपये लंपास करण्यात आले होते. या दोन घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे फौजदार आनंद बिच्चेवार यांना या गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या. बिच्चेवार यांनी गुप्त माहितीवरून या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर 25 नोव्हेंबर रोजी या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.
आरोपी सुबोध उर्फ बबलू सुनील वडगावकर (वय 21) राहणार शनी मंदिरजवळ हडको, वैभव राजू हुंडे (वय २०) राहणार दत्त मंदिर सिडको, मानव बालाजी मुरकुटे (वय २१) राहणार मातोश्री नगर सिडको आणि रोहित विजयकुमार कदम (वय २०) राहणार दत्त मंदिरजवळ विष्णुपुरी नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन तलवार, एक खंजर, एक कत्ती, रोख सात हजार रुपये, 14 मोबाईल आणि विविध कंपन्यांच्या बारा चोरीच्या दुचाकी असा सात लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻