Saturday, July 27, 2024

राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ लातूर कडकडीत बंद; शाळा भरल्या नाहीत, दुकानेही उघडली नाहीत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या आजच्या लातूर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. लातूरकरांनी कडकडीत बंद पाळून आपला सहभाग नोंदविला. सकल शिवप्रेमींनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने-प्रतिष्ठाने, शाळा- महाविद्यालये बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

शुक्रवार, २५ नोव्हेंबरला सकाळी ०९ वा. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दुचाकी रॅलीने या बंदला सुरुवात झाली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारीना तात्काळ राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी केली. राज्यपाल कोश्यारी तसेच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीच्या निषेधार्थ घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक, विवेकांनद चौक, गुळमार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, तहसील कार्यालय या मार्गांवरुन ही रॅली काढण्यात आली. काहीच्या हाती भगवे झेंडे तर काहींच्या हाती कोश्यारी यांच्या निषेधाचे फलक यावेळी होते. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत रॅलीने  शहरातील मुख्य मार्ग व चौक पिंजून काढले. ‘कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. दुपारी ०१ वाजता रॅलीचा तहसिल कार्यालयासमोर समारोप झाला. 

दुपारी ०१ वा. राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्या नावे तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा विचार हा सदासर्वदा विश्वव्यापी व विश्ववंद्य आहे. जगाने त्यांच्या कार्याची व शौर्याची थोरवी गायली आहे. तथापि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतरही महापुरुषांबाबत सातत्याने अवमानकारक विधाने करीत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या अशा वर्तनाने राज्यपालपदाचीही प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन तात्काळ हटवावे अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा तसेच  विधानपरिषदेत कोश्यारी यांच्याविरुध्द निंदाजनक ठराव मांडून, तो मंजूर करुन केंद्रशासनाकडे पाठवावा. ज्यात राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अन्यथा शिवप्रेमी कोणत्याही मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाहीत असा इशारा देण्यात आला. 

या बंदला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. ज्यात मुस्लिम संघटनांचाही सहभाग होता. ‘आम्ही मुस्लिम मावळे’ म्हणत अनेक मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. या बंदमधून हॉस्पिटल-मेडिकल सारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी लातूर पोलिसांनी ठिकठिकाणी मोठा बंदोबस्तही ठेवला होता. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!