Sunday, October 6, 2024

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून अस्थी चोरण्याचा कट; विश्वस्त मंडळाने व्यक्त केला संशय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

लातूर- अहमदपूर तालुक्यातील भक्तीस्थळ येथील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असणारे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून त्यांच्या अस्थी चोरून नेण्याचा कट काही समाजकंटकांनी रचल्याचा धक्कादायक आरोप भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाने केला आहे. याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. भक्तीस्थळाला पोलीस संरक्षण देऊन समाधी खोदण्यास, अस्थी बाहेर काढण्यास मनाई करावी. तसेच संशयित समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक, कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या महानिर्वाणानंतर अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ इथे त्यांची विधिवत समाधी बांधण्यात आली. मात्र महाराजांच्या मृत्यूनंतरही त्याचे भांडवल करण्याचा कट काही समाजकंटक सातत्याने करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता तर महाराजांची भक्ती स्थळावरील समाधी उकरून त्यातील अस्थी पळविण्याचा घाट काही समाजकंटकांनी रचला असून त्यातून भक्ती स्थळावरील विद्यमान विश्वस्त मंडळाला बदनाम करण्याचा तसेच इतरत्र समाधी स्थळ बांधण्याचा घाट काही जण आखत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अस्थी चोरून नेऊन त्या भंग करायचे मनसुबे काही जण आखत असल्याचा संशयही विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. त्यामुळे भक्ती स्थळाला पोलीस संरक्षण देऊन समाधी खोदण्यास, अस्थी बाहेर काढण्यास मनाई करावी. तसेच जे कुणी समाजकंटक असा प्रकार करतील त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर माधवराव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपुरे, व्यंकटराव गंगाधरराव मद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची होणारी संभाव्य विटंबना थांबवावी. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंतीही भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!