Saturday, July 27, 2024

लातूर महापालिकेच्या नळाला येणाऱ्या ‘पिवळ्या’ पाण्याचे गुढ कायम ! आता राष्ट्रीय अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे पथक उलगडणार ‘पिवळ्या’ पाण्याचं कोडं

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर:   गेल्या महिन्याभरापासून लातूर महानगरपालिकेच्या नळांना चक्क ‘पिवळं’ पाणी येतंय. त्यामुळे हे ‘पिवळं’ पाणी येत कुठून या विवंचनेत लातूर महानगरपालिका आहे. आता या पिवळ्या पाण्याचे गुढ उकलण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी थेट राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेच्या पथकाला पाचारण केले आहे. 

बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणातून लातूर शहराला दर आठ दिवसाला पाणी पुरवठा केला जातोय. मात्र गेल्या एक महिन्यापासून शहरातील विविध भागातील नळांना चक्क ‘पिवळं’ पाणी येत आहे. त्यामुळे हे प्यावं तरी कसं असा सवाल लातूरकर नागरिक दररोज उपस्थित करीत आहेत. या गंभीर मुद्द्यावर भाजप नेते माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेपुढे भाजपनं आंदोलनही केलं.  मात्र महापालिका प्रशासनाला अद्याप या पिवळ्या पाण्याचे कोडं सुटलेलं नाही. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांच्यासह महापालिका प्रशासन ‘पिवळ्या’ पाण्याच्या या कोड्यातून सुटण्यासाठी विविध उपाययोजना केल्यानंतर असफल ठरले. आता तर या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेची मागणीही होऊ लागली आहे. एकूणच ‘पिवळ्या’ पाण्याच्या या मुद्द्यावरून काँग्रेस- भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

दररोज या ‘पिवळ्या’ पाण्याच्या कथा सोशल मीडियातून झडत आहेत. तर सामान्य लातूरकराना ‘पिवळ्या’ पाण्यामुळे अडचणीत टाकलं आहे. हे पाणी प्यावं तरी कसं ? हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य लातूरकरांचे यामुळे आरोग्य धोक्यात येत नाही असाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ‘पिवळ्या’ पाण्याचे गूढ उकलण्यासाठी या संदर्भाने लातूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंतीनंतर पालकमंत्री देशमुख यांच्या सूचनेवरून आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे (नीर) National Environmental Engineering Research Institute (NEERI) एक पथक लातूरला येत असून पाण्याची तपासणी करून नंतर या संदर्भाने उपाययोजना सुचविणार आहेत.

शुध्दीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रासायनीक प्रक्रीयेतून पाण्याला आलेला पिवळसर तपकीरी रंग कायम राहत आहे. सदरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगण्यात येत असले तरी पिवळसर तपकीरी रंगामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. सातत्याने प्रयोग आणि प्रयत्न करूनही पाण्याला आलेला रंग दूर करण्यात यंत्रणेला यश येताना दिसत नाही.

याबाबत महापालिकेने एका प्रसिद्धी पत्रक काढले त्यात म्हटले आहे की, लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील काही भागामध्‍ये मागील काही दिवसापासून पिवळसर पाण्‍याचा पुरवठा होत आहे, पिवळसर रंगाचे पाणी पुरवठयाबाबत प्रशासनाकडुन वेगवेगळे उपाय करण्‍यात येत आहेत, लातूर शहरास पाणी पुरवठा करण्‍यात येणाऱ्या धनेगाव धरणावरुन कळंब शहरासदेखील पाणी पुरवठा करण्‍यात येतो, याठिकाणी देखील पिवळसर रंगाचे पाणी येत असल्‍याचे निदर्शनास येत आहे.

शहरास पुरवठा होणा-या पाण्‍याचे नमुने मुख्य जिवाणुशास्‍त्रज्ञ, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, लातूरमार्फत  घेण्‍यात आले असून तीन खाजगी सल्‍लागारांकडुनही पाण्‍याचे नमुने तपासून घेण्‍यात येत आहेत. त्‍याचबरोबर  National Environmental Engineering Research Institute (NEERI) मार्फत पाण्‍याचे नमुने तपासणीचे काम सुरु आहे. धनेगाव येथुन शहरास होणारा पाणी पुरवठा खालील बाजूस असलेल्‍या गेटवरुन होत असल्‍याने त्‍यामुळेही पिवळसर पाणी येत असल्‍याची शक्‍यता असल्‍याने धरणाच्‍या वरच्‍या बाजुचे गेट उघडण्‍याचे प्रयत्‍न सुरु असून त्‍याद्वारे शहरास पाणी पुरवठा करण्‍याचा प्रयत्‍न आहे. जलशुध्‍दीकरण केंद्रावरील Filter Bed बदलण्‍याची कार्यवाहीदेखील प्रगतीपथावर आहे. पाण्‍यामध्‍ये Chlorine dioxide (CLO2) चा आवश्‍यकतेनुसार वापर करण्‍यात येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

प्रशासनाकडुन पिवळसर पाण्‍याबाबत आवश्‍यक त्‍या उपाययोजना युध्‍दपातळीवर सुरु असून ज्‍या भागातील नागरीकांना पिवळसर रंगाच्‍या पाण्‍याचा पुरवठा होत आहे, प्रयोगशाळेमार्फत सदरील पिवळसर रंगाचे पाणी पिण्‍यायोग्‍य असल्‍याचा अभिप्राय दिला असला तरी खबरदारीचा उपाय म्‍हणुन त्‍या भागातील नागरीकांनी तोपर्यंत सदर पाणी पिण्‍यासाठी न वापरता इतर कामासाठी वापरावे आणि ज्‍या भागात स्‍वच्‍छ पाण्‍याचा पुरवठा होत आहे त्‍यांनी पाणी पिण्‍यासाठी वापरण्‍यास हरकत नाही. शहरातील सर्वच नागरीकांना लवकरात लवकर स्‍वच्‍छ व शुध्‍द पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी महानगरपालिका कटिबध्‍द आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपाने केले आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी अनुसंधान संस्था (नीर) पर्यावरण, विज्ञान आणि अभियांत्रीकी क्षेत्रातील देश पातळीवरील संस्था आहे. या संस्थेच्या देशभरात विविध ठिकाणी प्रयोगशाळा असून संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. पाण्याचे शुध्दीकरणात या संस्थेचे मोठे कार्य आहे. त्यामुळे हे पथक आल्यानंतर तरी लातूर महापालिकेच्या ‘पिवळ्या’ पाण्याचा रंग बदलतो का याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!