ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर नांदेडमध्ये आता ‘ब्लेम गेम’ सुरु झाला असून या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम केले नसल्याचा आरोप एकमेकांवर जाहीरपणे करण्यात येत आहे. असेच काहीसे पडसाद नांदेड येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटले.
नांदेडमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे बोलण्यासाठी उठले असतानाच भाजपचे पदाधिकारी बालाजी पुयड पुणेगावकर यांनी त्यांच्यावर जाहीरपणे आक्षेप घेतला. कंदकुर्ते यांनी लोकसभा निवडणूकीत योग्य पद्धतीने कामच केलेले नसल्याचा जाहीर आरोप त्यांनी भर बैठकीत केला. त्यामुळे बैठकीत काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बालाजी पुयड यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कंदकुर्त यांनी निवडणुकीत कामच केलेले नाही, आता त्यांचे भाषण काय ऐकायचे असा वारंवार आक्षेप बालाजी पुयड यांनी घेण्यास सुरुवात केली.
पुयड यांच्या या आरोपांना, मंचावर उपस्थित असलेले महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनीही उघडपणे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. तुम्ही किती काम केलेले आहे हे मला आणि आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गप्प बसा! असे प्रत्युत्तर कंदकुर्ते यांनीही पुयड यांना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. एकूणच भाजपाच्या नांदेड मधील धक्कादायक पराभवानंतर आता एकमेकांवर ब्लेम गेम सुरू झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करत प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विजय मिळवला केला होता. त्यानंतर आता तर खुद्द अशोक चव्हाणच भाजपामध्ये आल्याने नांदेड मधून भाजप मोठ्या मताधिक्याने अगदी सहजपणे विजय मिळवेल, असा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र घडले उलटेच! आणि भाजपाला नांदेडमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. त्यानंतर आता निवडणुकीत कोणी काम केले? आणि कुणी केले नाही? याचा कच्च्याचिठ्ठा असा जाहीरपणे मांडला जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻