Monday, October 14, 2024

वन्यप्राण्यांपासून पिकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढविली शक्कल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/तामसा- वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव पाहता, शेतीची राखण करणे सुलभ जावे म्हणून, राजवाडी (ता. हदगाव) येथील एका शेतकऱ्याने, बांधावरील उंच वृक्षाला “ध्वनि सयंत्र”(भोंगा) बांधून शेती पिकं वाचविण्यासाठी चांगलीच शक्कल लढविली आहे. या नामी युक्तीमुळे उपद्रवी प्राण्यावर वचक निर्माण होत असून पिकांचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे. याचेच अनुकरण इतर शेतकरी करीत असल्याने, ध्वनि संयंत्रालाही अच्छे दिन आले असल्याचे दिसत आहे.

या परिसरातील वनराई अजूनही बर्‍यापैकी टिकून असल्याने या जंगल परिसरात नीलगाय , हरिण, रानडुकरे, ससे अशा वन्य प्राण्यांचा, वावर मुक्तपणे होताना आढळून येतो.
या वर्षीचा पाऊस चांगला झाल्याने रब्बी पेरणीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली दिसून येते. शेतात सर्वत्र गहू, हरभरा, ज्वारी, टाळका, ही पिके जोमात वाढलेली दिसून येतात. यामुळे चांगल्या उताऱ्याची संधी आहे. (कारण या पिकाला आजवर पोषक वातावरण मिळाले आहे.

सध्या जंगलामधील बांधलेली पाणवठे कोरडेठाक पडल्याने, पिण्याच्या पाण्याच्या भटकंतीमुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा शेत शिवाराकडे वळवला आहे. त्यामुळे शेतकरी रात्रभर जागून पिकांची राखण करीत आहेत. परंतु, या उपद्रवी प्राण्यांमुळे पिकाची होणारी नासाडी काही केल्या थांबेना. परिणामी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणे ही नित्याची बाब बनली आहे.

ह्या वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव पाहता शेतीची राखण करणे सुलभ जावे म्हणून राजवाडी (ता.हदगाव) येथील शेतकरी सिद्धेश्वर श्रीसागर यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून एक नामी युक्ती अवलंबली असून, आपल्या शेतीच्या बांधावरील उंची वृक्षाला ध्वनिसयंत्र (भोंगा) बांधून शेतीची राखण चालवलेली आहे.

त्याचे फलित असे झाले की, रात्रीच्यावेळी बिनधोकपणे मुक्त संचार करणाऱ्या वन्य प्राण्यावर या ध्वनी संयंत्रातून रात्रभर निघणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आवाजामुळे (जसे कोल्हे, कुत्रे, मांजरे, यांच्या कर्कश आवाजामुळे) नियंत्रण आले आहे.शिवाय हा आवाज कुठून निघत आहे यांचा काहीच सुगावा मिळत नसल्याने (रोही, हरीण) या प्राण्याची एकच धांदल उडाली असून, जिवाच्या आकांताने ते सैरभैर पळताना दिसत आहेत.

या भोंग्याचा चांगला परिणाम होण्याने, रात्री-बेरात्री जागलीवर जाण्याचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही शक्कल खर्चिक नसल्याने बऱ्याच शेतकऱ्याची पसंती या ” भोंगा” ला  असल्याचे दिसून येत असल्याने बहुतांश ठिकाणी याचेच अनुकरण होत असल्याचे दिसून येत आहे.

रानडुकराचा उपद्रव

गत वर्षीच्या उसाची अगदी वेळेत तोड होण्याने बर्‍यापैकी मिळकत मिळाली. यावर्षी ऊस वेळेवर जाईल अशी अपेक्षा असतानाच तालुक्यातील सुभाष साखर कारखान्याच्या ढोबळ कारभारामुळे या परिसरातील बराच ऊस खितपत पडला आहे. याच उसाच्या फडात रानडुकराने आपले बस्तान मांडले असल्याने उसाची मोठी नासाडी होत असल्याने उसाची तोड लवकर होणे गरजेचे आहे.

-सिद्धेश्वर श्रीसागर शेतकरी, राजवाडी.

काटेरी जाळीची व्यवस्था आवश्यक

अतिवृष्टी आणि रोगराईच्या फेऱ्या मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता जंगली प्राण्यांची आव्हान उभे टाकले आहे. पर्यायी भोंग्यालाही घाबरत नसल्याने उसाचे फड उद्ध्वस्त करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा जंगलालगत असलेल्या शेतीला काटेरी जाळीची व्यवस्था करावी अशी मागणी आहे.

-साईनाथ फुलारे, सरपंच प्रतिनिधी राजवाडी, तालुका हदगाव.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!