ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उदघाटन
नांदेड– येथील परिवहन कार्यालयात अनुज्ञप्ती चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 15 नुसार प्रत्यक्ष चाचणी घेण्यापूर्वी उमेदवाराची सिम्युलेटवर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड कार्यालयास Vertex Research Centre कंपनीचे 2 सिम्युलेटर शासनाकडून प्राप्त झाले आहेत. सदर दोन्ही सिम्युलेटर या कार्यालयात बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन गुरुवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे, मोटार वाहन निरीक्षक, सहा. मोटार वाहन निरीक्षक व सर्व कर्मचार्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी सदर सिम्युलेटरची संपूर्ण माहिती घेऊन स्वतः सिम्युलेटरवर प्रात्यक्षिक करून पाहिले. तसेच रस्ता सुरक्षा कक्ष, शिकाऊ अनुज्ञप्ती कक्ष व संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली व सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
ड्रायव्हिंग सिम्युलेटरचा उपयोग चारचाकी वाहन शिकण्यासाठी व पक्के लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी घेण्यासाठी होणार आहे. शिकाऊ वाहन चालकांना शास्त्रीय प्रशिक्षण देऊन नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट वाहन चालक तयार करणे शक्य होईल. तसेच सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेऊन नांदेड जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपयोग होईल, असे सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻