Wednesday, July 24, 2024

विदेशात ट्रीप व महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष, नांदेडमध्ये मुख्याध्यापकासह सात जणांना सव्वाकोटीचा गंडा; वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहराच्या कौठा येथील शिक्षकास व त्याच्या अन्य सहा मित्रांना विश्वासात घेऊन गुंतवणुकीच्या मोबदल्यात कमी कालावधीत जास्त परतावा, विदेश दौरा आणि महागड्या गाड्यांची भेट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुख्याध्यापकासह सह सात जणांची जवळपास एक कोटी चौदा लाख 53 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

शहराच्या जुना कौठा श्रीपादनगर येथे राहणारे मुख्याध्यापक आनंद नागनाथराव रेणुगुंटवार (वय 54) हे पंढरपूर येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तेथे त्यांची कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलएलबी कंपनीचे मुख्य मॅनेजमेंट डायरेक्टर रोहितसिंग धर्मासिंग सुभेदार रा. दत्तनगर, किर्लोस्करवाडी रोड पलूस, जिल्हा सांगली यांच्यासोबत भेट झाली. त्यानंतर भेटीचे रुपांतर चांगल्या ओळखीत होऊन त्यांनी आनंदराव रेणुगुंटवार आणि त्यांच्या इतर सहा साथीदारांना मार्च २०२१ ते माहे ऑगस्ट २०२२ दरम्यान रोहितसिंग धर्मासिंग, डायरेक्टर डॉक्टर बाबुराव हजारे राहणार कोल्हापूर व कंपनीचे पदाधिकारी यांनी भुलवून गंडा घातला. यात शिवाजी गणपत हजारे धनगर गल्ली सिद्धनेर्ली कोल्हापूर, बाबासो भोपाल धनगर आणि इंद्रजीत भारत म्हाळुंगे राहणार शेंद्री तालुका गडहिंग्लज सेंद्रिय बाड्याची वाडी कोल्हापूर व इतरांनीही फसवणूक केली.

आरोपीतांनी नियोजनबद्ध पद्धतीने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी गुंतवणूकदार लोकांना फसवून कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड एलएलबी नावाची कंपनी उघडून वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणुकीच्या मोबदल्यात विविध आमिषे दाखविली. यात कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे, विदेश ट्रीप घडवण्याचे व महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष दाखवून यांना गुंतवणूक करण्यासाठी भुलवले. गुंतवणूकदारांना हमी व त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित आहे असे भासविण्यासाठी करार पत्र करून गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये जमा झालेल्या रक्कमावर गुंतवणूकदारांना सुरुवातीस काही महिने परतावे दिले.

पण नंतर उर्वरित परतावे व मुद्दल न देता मुख्याध्यापक व त्यांच्या इतर साथीदारांची एकूण एक कोटी 14 लाख 53 हजार 700 रुपये इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केली. यानंतर हे सर्व पैसे २०२१ ते माहे ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान वजिराबाद येथील एसबीआय बँक शाखा आणि कलामंदिर येथील ॲक्सिस बँकेतून पाठविण्यात आले होते. या प्रकरणी अखेर आनंद रेणुगुंटवार यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. यावरून कलम 406, 420, 120 (ब ) भादविसह कलम ३,४,५ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री मंठाळे तपास करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!