ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• नांदेडच्या मुस्लिम नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट
नांदेड – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पण खुद्द त्यांच्याच जिल्ह्याच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी मात्र अशोक चव्हाण यांच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आपण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. दरम्यान, नांदेडच्या मुस्लिम नगरसेवकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मी काँग्रेस पक्षाचा असून काँग्रेस पक्ष सोडून इतरत्र अन्य पक्षात जाणार नाही. मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी ‘दैनिक गोदातीर समाचार’शी बोलताना दिली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी, काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर म्हणाले की, मी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. मला काँग्रेस पक्षाने भरपूर काही दिलेले असून मी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. माझी काँग्रेस पक्षाशी नाळ जुळलेली असून सध्या मी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे नव्या उमेदीने काम करणार असल्याचेही गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी स्पष्ट केले आहे.
मुस्लिम नगरसेवक मुंबईत
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खास बोलावणे आल्यानंतर नांदेडच्या मुस्लिम नगरसेवकांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आणि आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यात माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, मसूद अहमद खान, काँग्रेस प्रवक्ते मुंतजिबोद्दिन, शेर अली आदी अनेक नगरसेवकांचा समावेश होता.
भास्करराव पाटील खतगावकर
तर माजी खासदार खतगावकर यांनी, मराठवाड्याच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या निर्णयासोबत मी व माझे तमाम कार्यकर्ते असल्याचे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
अशोकराव चव्हाण यांनी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी घेतलेला निर्णय नांदेड व मराठवाड्यासाठी योग्य असल्याचे माजी खासदार खतगावकर यांनी सांगितले.
खतगावकर म्हणाले की, मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारमध्ये अशोकराव चव्हाण सारखा उंचीचा नेता नव्हता. त्यामुळे विकासाला गती मिळत नव्हती. जसे की नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्या त्या विभागाचा विकास करतात. परंतु मराठवाड्याला ती गती मिळू शकली नाही. मराठवाड्याचे मागील अनेक वर्षापासूनचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यात रेल्वे प्रश्न, नांदेडचे महसूल आयुक्त, पोलीस आयुक्तालय यासह आदी मागण्या प्रलंबित आहेत. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात केलेला प्रवेश मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा ठरणारा आहे. मी व माझे सर्व कार्यकर्ते अशोकराव चव्हाण यांच्या सोबत असल्याचे खतगावकर यांनी सांगितले. समृद्धी मार्गाला मंजुरी मिळाली, परंतु ज्या गतीने काम व्हावयास हवे ते होत नाही. कारण बजेट जरी मंजूर झाले तर ते मंजूर बजेट आणण्यासाठी वजनदार नेता केंद्र सरकारमध्ये पाहिजे होता तो नक्कीच अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मिळाला अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न, नांदेड विमानतळ, लेंडीचे पुनर्वसन तसेच नांदेड- तेलंगणा सीमेपर्यंत सहा पदरी रस्ता या आदी कामांच्या विकासाला गती मिळणार आहे. लवकरच अशोकरावांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. नांदेडकरांनी व तमाम अशोकराव चव्हाण यांच्या चाहत्यांनी अशोकरावांचे हात बळकट करण्यासाठी व मराठवाडा आणि नांदेडच्या विकासासाठी त्यांच्यासोबत यावे असे आवाहनही माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार अविनाश घाटे, श्रीराम पाटील राजूरकर, माजी नगरसेवक नवल पोकर्णा, डॉ. मीनलताई खतगावकर, माजी उपमहापौर सरजितसिंग गिल आणि जितेंद्र दायमा यांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻