Saturday, June 22, 2024

वीजबिल वसुली न होणाऱ्या भागात लोडशेडिंग होणार -महावितरणचा इशारा; नांदेड जिल्ह्यात 2 हजार 31 कोटी थकबाकी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

संकट टाळण्यासाठी बिल भरणे हाच पर्याय -महावितरणचे ग्राहकांना आवाहन

नांदेड: वीजबिल वसुली न होणाऱ्या भागात लोडशेडिंग होणार करण्यात येणार असल्याचा माहितीवजा इशारा महावितरणने दिला आहे.

महावितरणने म्हटले आहे की, वीजबिलांची प्रचंड थकबाकी आणि विविध देणी यामुळे महावितरण संकटात सापडली आहे. उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या प्रचंड मागणीमुळे महावितरण सध्या सेंट्रल पॉवर एक्सचेंजसह विविध स्रोतांकडून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवत आहे. मात्र वीज खरेदी खर्च व वीजबिल वसुलीचा ताळमेळ बसवताना महावितरणला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा येत्या काही दिवसांत भारनियमनाशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणने म्हटले आहे.

राज्याची कालची विजेची मागणी २४ हजार ५०० मेगावॅट इतकी असून, महावितरणने तिची पूर्तता केली आहे. जवळपास ३१ दशलक्ष युनिट वीज महावितरणने सेंट्रल पॉवर एक्सचेंजसह विविध स्रोतांकडून १५ रुपये प्रतियुनिट या महागड्या दराने खरेदी करून ग्राहकांना पुरवली आहे. याउलट हीच वीज घरगुती, कृषी व विविध वर्गवारीतील ग्राहकांना महावितरणकडून सवलतीच्या दरांत दिली जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी वाढतच जाणार आहे.

आज महावितरणची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. विविध देणी आणि ग्राहकांकडील वीजबिलांची थकबाकी यामुळे महावितरण संकटात सापडली आहे. सध्या वीजबिल वसुली मोहीम सुरू असली तरी त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर विजेची खरेदी आणि त्यासाठी लागणार पैसा याचा ताळमेळ घालणे अवघड जात आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपली वीजबिले तत्परतेने भरणे हाच उपाय आहे. वसुलीचे प्रमाण कमी असताना महागडी वीज विकत घेणे आणि ती पुरवणे महावितरणच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे वीज खरेदीसाठी पैसाच नसेल तर नाईलाजास्तव महावितरणसमोर भारनियमनाशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. ज्या भागात वीजबिल वसुली कमी असेल त्याच भागात भारनियमन होईल.

मराठवाड्यातील ग्राहकांकडे आज वीजबिलांची १६ हजार ४७६ कोटी रुपये एवढी  थकबाकी आहे. त्यात १२ हजार ७२४ कोटी कृषिपंप ग्राहकांकडे तर घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांकडे ८३७ कोटी रुपये थकबाकी आहे. भारनियमनाचे संभाव्य संकट टाळण्यासाठी मराठवाड्यातील ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

कृषी ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

महावितरणतर्फे कृषिपंप वीज धोरणात कृषी ग्राहकांना वीजबिलांत जवळपास ६६ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. सवलत योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे. तसेच कृषी वीजबिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्हानिहाय वीजबिल थकबाकी
नांदेड –  २०३१  कोटी
हिंगोली – १२१५ कोटी
परभणी- १७१३ कोटी   

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!