Tuesday, October 15, 2024

पाकिजानगर ऐवजी टाईप झाले पाकिस्तान नगर! आणि उडाला एकच गोंधळ; नांदेडमधील प्रकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- पार्सलसाठी व्हॉइस रेकोर्डवर पत्ता टाईप करताना पाकीजानगर ऐवजी पाकिस्ताननगर टाईप झाल्याने येथे काहीकाळ एकच गोंधळ उडाला होता.

ऑनलाइन खरेदी केल्यामुळे अनेकांना संबंधित कंपन्यांकडून फटका बसतो. परंतु नांदेडमध्ये मागवलेल्या पार्सलच्या पत्त्यामध्ये शहरातील पाकिजानगर ऐवजी पाकिस्ताननगर आल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. मात्र इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली असता तो अशिक्षित असून त्याने व्हाईस रेकॉर्डद्वारे पत्ता लिहून पाठविल्याने ही गडबड झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

देगलूर नाका भागातील शेख खलील (वय २६) या तरुणाने आपल्या एका लहान मुलगा असणाऱ्या नातेवाईकांसाठी ऑनलाइन कपडे मागवले होते. सदर कपड्याची डिलिव्हरी ही कोलकत्ता येथून होणार होती. ऑनलाइन पत्ता देताना शेख खलील हा अशिक्षित असल्याने त्याने आपल्या मोबाईलवरुन व्हाईस रेकॉर्डद्वारे आपला पत्ता पाकिजानगर नोंदविला, परंतु व्हॉईस रेकॉर्डमध्ये पाकिजानगरऐवजी पाकिस्ताननगर असे टाईप झाले आणि संबंधित कंपनीने याच पत्त्यावर मागवलेले कपडे पार्सलने पाठविले.

हे पार्सल नांदेडमध्ये आल्यानंतर पार्सल व त्याच्यावरील पत्ता सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नांदेड शहरात किंवा जिल्ह्यात पाकिस्ताननगर नावाचे नगर असण्याचा प्रश्नच येत नाही, मग हा पत्ता कुणी आणि का टाकला या विचाराने पोलिसही चक्रावून गेले. अखेर शेख खलील या युवकास इतवारा पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. तो अशिक्षित असल्याने त्याला लिहिता- वाचता येत नाही म्हणून त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून व्हाईस रेकॉर्डद्वारे आपला पत्ता पाठविला. परंतु त्यात पाकीजानगर ऐवजी पाकिस्ताननगर पडल्याने गोंधळ झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर त्या युवकास सोडून देण्यात आले.

दरम्यान, विविध जाती-धर्मात तेढ, गैरसमज निर्माण होणाऱ्या कुठल्याही अफवा किंवा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!