ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड – नांदेड परिक्षेत्राचे नवे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे डीआयजी शशिकांत महावरकर यांची पुणे येथे सीआयडीच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहविभागाने मंगळवारी एकूण सात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात उमाप यांची नांदेडच्या डीआयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रात नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले डीआयजी शहाजी उमाप यांनी नांदेड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक पदावर काम केलेले आहे. त्याचबरोबर नांदेड परिक्षेत्रातील परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतही त्यांनी कर्तव्य बजाविलेले आहे. एकूणच या परिक्षेत्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कर्तव्य बजावलेले शहाजी उमाप यांची या परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असताना त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत नांदेड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवून दिला होता. गृह विभागाने एकूण सात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून शहाजी उमाप यांच्यासह नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची ठाणे शहरात अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नांदेड परिक्षेत्राचे सध्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथे सीआयडीचा पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻