Monday, June 17, 2024

शाळेतील वर्गाच्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे; नांदेडमध्ये अभिनव उपक्रमाने शाळांना सुरुवात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचा जिल्हाभर उपक्रम

नांदेड– जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना अभिनव उपक्रमाने सुरुवात करण्यात आली आहे. शाळांच्या वर्गाच्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या पावलांची ठसे उमटवून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हाभर हा उपक्रम राबविला आहे.

शालेय शिक्षणात मानवी मूल्यांच्या संवेदना घेऊन शालेय विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसे वागावे याबाबत आजवर विदेशी उदाहरणांची जोड द्यावी लागत होती. याला नांदेड जिल्ह्यातील एका अभिनव उपक्रमाने छेद देत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांनी आज आत्मविश्वासाचा नवा मापदंड विकसित केला.

एरवी शाळेतील पहिले पाऊल म्हणून पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनातही प्रचंड घालमेल असते. मुले शाळेची वास्तू पाहून काही ठिकाणी घाबरून रडायलाही लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलांना शाळेत ताटातील कुंकवाच्या पाऊलाने ओले करून त्याचा ठसा तो ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाच्या भिंतीवर ठेवत नवा आत्मविश्वास देण्याचा अभिनव प्रयोग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आज संपूर्ण जिल्हाभर राबविला.

“मुलांच्या मनात असलेली भिती दूर करणे, शिक्षकांच्या प्रती त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे ही अंत्यत आवश्यक असलेली बाब आहे. एरवी ती दूर्लक्षित असते. याबाबत आम्ही सर्वांनी शांततेत विचार करून मुलांच्या व शिक्षकांच्याही मनात नवा विश्वास निर्माण करता यावा यादृष्टिने हा अभिनव उपक्रम घेतल्याची” माहिती वर्षा ठाकूर यांनी दिली. मागील आठवडाभर त्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांशी, शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. शिक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद देत कोविड-19 च्या काळात मुक झालेल्या शाळांच्या भिंतींना आता अधिक आत्मविश्वासासह बोलके केल्याचे त्यांनी सांगितले.

हदगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या देशमुखवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी आज मुलांसोबत एक तास घेतला. या शाळेत आदिवासी अंध समाजातील 30 मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मनात विश्वास जागविण्यासमवेत त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात स्वखर्चाने या मुलांना दप्तराचीही भेट देऊन आपली वैयक्तिक कृतज्ञतेचा प्रत्यय दिला. दरवर्षी वाढदिवसानिमित्तचा आजवर जपलेला एक पायंडा त्यांनी या आदिवासी मुलांसोबत साजरा केला.

गाव परत्वे शिक्षकांनी दिली कल्पकतेची जोड
किनवटच्या काठावर असलेल्या परोटी तांडा या गावात विद्यार्थी मोठ्या कुतुहलाने शाळेत पोहचले. आदिवासी भागातील तांड्यावरची ही शाळा असल्याने विद्यार्थीही तुरळक. असे असतांनाही जुने सवंगडी एक होत शाळेत दाखल होत होते. वनसंपदेशी जवळिकता असलेल्या या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वाघाची मुखवटे देऊन प्राण्यांप्रती आदर भावना व्यक्त केली. मुलंही या मुखवट्यातून प्रत्यक्ष फळावरील खडूतून उमटलेल्या बाराखडीपर्यंत पोहचले. कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेच्या भेटीसाठी शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी आवर्जून भेट देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. काही शाळांनी फुग्यांची जोड देत वर्गांला सजवले तर काही शाळांनी झोके उभारून मुलांच्या स्वछंद मनाला आभाळाला गवसणी घालण्याचे बळ दिले.

जिल्हाभरात आज सुमारे 3 लाख 34 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्याच्या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळा, समाज कल्याण, मनपा, नपा, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित असा एकुण 2 हजार 909 शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 33 हजार 912 लाभार्थी विद्यार्थ्यांना हे मोफत पुस्तके दिली जात आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!