Sunday, June 16, 2024

विविध शासकीय कार्यालयांसह गावागावात उभारण्यात आला भगवा स्वराज्य ध्वज आणि स्वराज्यगुढी; नांदेडसह राज्यभरात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

 
🚩पुढील वर्षांपासून प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली जाणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नांदेड– शासकीय कार्यालयांसह गावागावात भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवाद करण्यात आले. नांदेडसह राज्यभरात भगवा स्वराज्य ध्वज आणि स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, पुढील वर्षांपासून प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे व मान्यवरांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वार्थाने सुराज्य होते. प्रजेच्या कल्याणाचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय याची प्रचिती रयतेने अनुभवली. लोक कल्याणाचा, शेतकरी, कष्टकरी, बहुजनाच्या हिताचा समृद्व वारसा ग्रामीण भागापर्यत या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने पोहचवित आहोत. या दिनाच्या निमित्ताने सर्वानी प्रेरणा घेत लोककल्याणाप्रती कटिबध्द होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभ संदेशात केले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशान विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कृषी अधिकारी टि.जी. चिमनशेट्टे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. आई जीजाऊच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच त्यांनी शौर्याचे धडे गिरवत स्वराज्याचे तोरण बांधले. हे राज्य सुखी व्हावे, हे राज्य रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी स्वराज्याचे तोरण बांधले. एका समृध्द्व नितीचा, जनकल्याणाचा वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हा वारसा प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत, पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत आपण आज सर्वांपर्यत अप्रत्यक्षरित्या पोहचवित आहोत. या दिनापासून आपण सर्वजण प्रेरणा घेवू या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाहीर रमेश गिरी व संचाने महाराष्ट्र गीत सादर केले. फत्तेपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पुढील वर्षांपासून प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली जाणार


पुणे– पुढील वर्षांपासून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाईल आणि प्रत्येक वर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा शासनातर्फे सोहळा साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात सएसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात केली.

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे असावे यासाठी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयातदेखील हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून महाराष्ट्राला वेग्ळी दिशा दिली, राज्यावरचे संकट दूर केले, देशाला दिशा दिली. अशा राजांच्याप्रति आदराची भावना व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात शिवशक राजदंड स्वराज्य ध्वज लावल्यास महाराजांच्या कार्याची प्रेरणा महाविद्यातील विद्यार्थ्यांना मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे अराध्य दैवत आहे. त्यांची रणनिती, नम्रतेचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि त्यांचे चरित्र्य राज्यातील जनतेसमोर यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अमित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. सामंत यांच्याहस्ते 51 फुट उंच शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. कार्यक्रमाला किरण साळी, सौजन्य निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!