ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अस्थी चोरल्याच्या खोट्या भूलथापांना समाजाने बळी न पडण्याचे आवाहन
नांदेड/ लातूर- शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी खोदल्याप्रकरणी दै. गोदातीर समाचारमध्ये ऑनलाईन आणि अंकात वृत्त प्रकाशित होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. याबाबत लिंगायत समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत शिवा संघटनेने एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधीचे काम सध्या जोमाने सुरू असून हे काम रोखण्याचा काही जणांचा डाव आहे. हे खोदकाम नियमाप्रमाणे झाले असून यात कोणताही बेकायदेशीर प्रकार नसल्याचे शिवा संघटनेने म्हटले आहे. अस्थी चोरल्याच्या खोट्या भूलथापांना समाजाने बळी न पडण्याचे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.
शिवा संघटनेने प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना देहरूपाने जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. परवा त्यांचा द्वितीय समाधी सोहळा अत्यंत उत्साहात भक्तीस्थळ अहमदपूर येथे साजरा झाला. त्यांच्या या द्वितीय समाधी सोहळ्यानिमित्त १० सप्टेंबर २०२२ रोजी शिवा संघटनेने प्रथम समाधी सोहळ्यानिमित्त जाहीर केल्याप्रमाणे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते व लातूरचे खा. सुधाकर श्रृंगारे, आ. रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री विनायक पाटील आदी मान्यवरांच्या व हजारो भक्त मंडळीच्या उपस्थितीत राष्ट्रसंतांच्या समाधी मंदिर बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. ते सर्वज्ञात असतानाही केवळ भोळ्याभाबड्या समाजाची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी खोदली, अस्थीसह अष्टधातूची पेटी लंपास केली, अशा आशयाची खोटी तक्रार अज्ञाताविरुद्ध ट्रस्टमधुन काढुन टाकलेल्या विश्वस्तांनी केली असल्याचे प्रा. धोंडे यांनी म्हटले आहे. अशा खोट्या अफवा भुलतापांना समाजाने बळी पडु नये अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधी मंदिराचे बांधकाम जोमाने सुरू झाले असताना वीरशैव लिंगायत समाजामध्ये व भक्त मंडळीमध्ये गैरसमज पसरवून राष्ट्रसंतांच्या पवित्र समाधी मंदिराची उभारणीही वादातीत रहावी, हा दुष्ट हेतू ठेवून पाप करण्याचे काम दुसरे तिसरे कुणी करत नसून आमच्याच समाजातील स्वार्थी व राष्ट्रसंतांनी भक्तीस्थळ ट्रस्टमधुन काढून टाकलेले नतदृष्ट माधव बरगे, सुभाष सराफ, बबन हैबतपुरे, व्यंकट मुद्दे, शिवशंकर मोरगे, संदीप डाकुलगे या अस्तित्वात नसलेल्या खोट्या विश्वस्त मंडळांनी केले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
या सहाही लोकांना राष्ट्रसंतांनी स्वतः हयातीत असताना भक्तीस्थळ चॅरिटेबल ट्रस्टमधून कायद्यान्वये व नियमानुसार काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांचा भक्तीस्थळ ट्रस्टशी काहीही संबंध राहीलेला नाही. त्यामुळे समाजाने अशा खोट्या लोकांच्या भुलथापांना बळी न पडता राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधी मंदिराचा व भक्तीस्थळाचा विकास करण्यासाठी शिवा संघटना कटीबद्ध आहेच. कपिलधारमध्ये घोषित केल्याप्रमाणे तिसऱ्या पुण्यतिथी पर्यंत राष्ट्रसंताचे भव्य समाधी मंदीर बांधकाम आपणास पुर्ण करावयाचे आहे. त्यामुळे आपण समाज म्हणून निष्ठेने व जोमाने कामाला लागावे, असे आवाहन प्रा. मनोहर धोंडे यांनी वीरशैव लिंगायत समाजासह बहुजन समाजाला केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻