Tuesday, October 15, 2024

शिवसंवाद दौरा: जिल्हा परिषद, महापालिकेवर भगवा फडकवण्याचा शिवसेनेने व्यक्त केला निर्धार; नांदेडमधील खराब रस्त्यांवरून काँग्रेसवर निशाणा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शिवसंवाद अभियानासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार अनिल देसाई यांनी नांदेड जिल्हा परिषद आणि  महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नांदेडमधील खराब रस्त्यांवरून काँग्रेसवर निशाणादेखील साधला आहे.

दोन दिवसांपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी शिवसंवाद दौर्‍याचे फलित मिळाले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा संघटन बांधणी मजबूत झाली असल्याचे सांगितले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जोमाने कामाला लागून जिल्हा परिषद आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास खा. देसाई यांनी मिनी सह्याद्री विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जिल्हा दौरा करत असताना रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली दिसली, याबाबत स्वतः मी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगून रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा या विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये शिवसंवाद दौरे खासदारांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहेत. शिवसंवाद दौर्‍यामध्ये पक्ष बांधणी मजबूत करण्यात येत आहे.  शिवसंपर्क मोहीम ही काही नवीन नाही. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये शिवसंवाद दौरे झाले नव्हते. शिवसैनिकांशी थेट पदाधिकाऱ्यांचा संवाद व्हावा, ग्रामीण व शहरी भागातील शिवसेना वाढीसाठी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्या समस्या काय आहेत त्यावर काय उपाय करता येईल यासाठी हा शिव संवाद दौरा आयोजित केला होता. जिल्ह्यात दोन दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अनेक ठिकाणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हे शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. येत्या काळात जिल्ह्यात भगवेमय वातावरण पहावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न त्यांच्या मागण्या त्यांच्याशी संवाद साधून ऐकून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. एकंदरीत दोन दिवस शिवसंवाद दौऱ्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. यासह केंद्रीय तपास यंत्रणा भाजपचे राज्य सोडून अन्य राज्यातच व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळणी झाली असून याबाबतचा पत्रव्यवहार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिणार असल्याचे सांगितले.

कश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांना मारहाण, पळवून नेणे त्यांचे अपहरण होणे आदी घटना दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मी अजून तरी हा चित्रपट बघितला नाही. मात्र त्यावेळी काश्मिरी पंडितांना फक्त आणि फक्त धीर दिला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी! असे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, डॉ. मनोजराज भण्डारी, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, युवा सेनेचे प्रदेश सहसचिव माधव पावडे, तालुका प्रमुख जयवंत कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!