Saturday, June 22, 2024

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर व्यावसायिकांना धमकवण्याचे प्रकार, गुप्ता आणि फरांदेंना 1 कोटींच्या खंडणीची मागणी; धमकी देणारा निघाला नातेवाईक, नागरिकांनी घाबरून जाऊ नये -डीआयजी तांबोळी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर आपले हेवेदावे आणि जुन्या वादातून धमकीचे पत्र पटवविणाऱ्यांचे जणू पेव फुटले आहे. असाच एक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने दोन व्यावसायिकांना पत्र पाठवून जिवे मारण्याची भिती दाखवून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, अशी माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अशी पत्रे कोणाला आली किंवा बियाणी हत्येच्या संदर्भाने कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती पोलीसांना द्यावी असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी केले. तसेच बियाणी हत्याकांडानंतर त्या तपासात विघ्न आणण्यासाठी असे अनेक प्रयत्न सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी सुबुध्दीने विचार करून शंका असेल तर पोलीस विभागाला सांगा, आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्परच आहोत, असे तांबोळी म्हणाले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे उपस्थित होते.

पुढे बोलतांना निसार तांबोळी म्हणाले की, काही जणांना धमक्या आल्याबद्दलच्या चर्चा होत आहेत. कांही लोकांना लेखी आणि काही लोकांना फोनद्वारे धमक्या आल्याची माहिती पोलिसांना आहे. त्या प्रत्येक माणसाला पोलीस विभाग बोलून त्यांची भीती दुर करण्याचा प्रयत्न करीत आहे. बियाणी प्रकरणात पोलीस विभागातील पथके 24 तास काम करत आहेत. त्या तपासात अडथळा आणण्यासाठी विषय सोडून वेगळ्या चर्चा आणि वेगळ्या प्रकारची टीका अयोग्य आहे. या संदर्भाने बियाणी कुटूंबियांना सुध्दा एक पत्र आले होते. ते पत्र व्यक्तीगत स्वार्थातून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी होते आणि तपासाची दिशा भरकटण्यासाठी प्रयत्न करणारे होते. त्याचा शोध पोलिसांनी लावला. त्यातील गुन्हेगारांविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या व्यक्तीला अटकपण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शाम कमलकिशोर गुप्ता (वय 27) रा.भाग्यनगर यांना एक पत्र आले. तसेच बांधकाम व्यवसायीक कौस्तुभ फरांदे यांना सुध्दा खंडणी मागून रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी आली. याबाबत पोलिसांनी गुप्ता आणि फरांदे यांची भेट घेवून त्यांना सुरक्षेचा विश्वास दिला आहे. या बाबत गुप्ता यांना धमकी देणारा व्यक्ती पुरूषोत्तम रामचंद्र मांगुळकर (वय 37) रा. हिमायतनगर जि. नांदेड ह.मु. भाग्यनगर कमानीच्या आत, नांदेड यास पकडण्यात यश आले. हा शाम गुप्ता यांचा नातेवाईक निघाला. ही कामगिरी करण्यामध्ये हिमायतनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन, शिवाजीनगरचे रवि वाहुळे, पोलीस अंमलदार राजकुमार डोंगरे यांनी उत्कृष्ट आणि उल्लेखनिय कामगिरी करत पुरूषोत्तम मांगुळकरला पकडले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात मांगुळकर विरुध्द गुन्हा क्रमांक 140/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 385 आणि 386 नुसार दाखल करण्यात आला असून भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे तपास करत आहेत.

बियाणी यांची हत्या झाल्यानंतर धमकीचे पत्र पाठवून अनेकांना खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत, पुढेही घडतील. अशा वेळेस जनतेने असा कोणताही धमकीचा संदेश, पत्र आले तर त्या बाबत पोलिसांना माहिती द्यावी, पोलीस कोणत्याही परिस्थिती, कोणत्याही वेळी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. आणि आम्ही पोलीस विभागाच्यावतीने जनतेला ही ग्वाही देवू इच्छीतो की, कोणत्याही प्रसंगाला इतर प्रकारे चर्चा करण्याऐवजी पोलीसांसोबत ती गोष्ट, ती घटना, ती धमकी, ते पत्र याबाबत माहिती द्या. आमच्यावर तुमच्या सुरक्षेची जबाबदारीच आहे, आम्ही त्यासाठी तत्पर आहोत असे निसार तांबोळी म्हणाले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!