ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर : नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा निषेधार्थ लातूरमध्ये मारवाडी समाजाच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी बियाणी यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
लातूरच्या बालाजी मंदिरात मारवाडी समाजाने एका निषेध सभेचे आयोजन आज दि.७ एप्रिल रोजी करण्यात आले होते. यात लातूर शहरातील मारवाडी समाजातील महिला, पुरुष, तरुण-तरुणी एकत्र आले होते. नांदेडचे प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरापुढे निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा या सभेत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. बियाणी यांच्या डोक्यात आणि शरीरावर अनेक गोळ्या झाडणाऱ्या आरोपींवर आणि या घटनेमागील सूत्रधारांना तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी. त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी आणि मास्टरमाईंडला तात्काळ गजाआड करावे. तसेच त्यांच्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. लातूर शहरातही मागील काही वर्षांपूर्वी गोपीकिशन अग्रवाल व मालू बंधूंची अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपींवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही, त्याची खंतही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात तरी नांदेड पोलिसांनी विनाविलंब कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात व्यापारी बांधव कोणत्याही क्षेत्रातील खंडणीबहाद्दरास थारा देणार नाहीत. यासाठी शासन स्तरावरूनही व्यापाऱ्यांना योग्य ते सहकार्य व सुरक्षा पुरविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या निषेध सभेस ऍड. संतोष गिल्डा, सुंदरलाल दरक, लक्ष्मीरमन लाहोटी, गोविंद पारीख, कमलकिशोर अग्रवाल, विनोद कुचेरिया, चंदू लड्डा, राजकुमार पल्लोड, प्रेमकिशोर मुंदडा, शिवकुमार मालू, गणेश हेड्डा, दिनेश गिल्डा, लक्ष्मीकांत सोनी, बाळूसेठ बिदादा, हुकूमचंद कलंत्री, राजू मालपाणी, ईश्वरप्रसाद डागा, सुरेश मालू, सौ. सुलोचना नॊगजा, सौ. सरोज बलदवा, सौ. वंदना दरक, गोवर्धनदास भंडारी, आनंद पुनपाळे, संतोष तोष्णीवाल, ईश्वर बाहेती, दामोदर भुतडा यांच्यासह मारवाडी समाजातील जवळपास शेकडो स्त्री, पुरुष, तरुण-तरुणी आणि व्यापारी उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, लातूरचे पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
