ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या शारदानगर भागात राहणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या निवासस्थानासमोर गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी विशेष तपास यंत्रणेकडून आज आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यात एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे. यापूर्वी सात आरोपी पोलिसांनी अटक करण्यात आलेली असून या हत्या प्रकरणात आरोपींची एकूण संख्या 9 वर पोहोचली आहे. आज अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा विमानतळ, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथक करत होते. पोलिसांनी सात आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. हे सध्या सातही जण पोलीस कोठडीत आहेत.
या प्रकरणाचा पुढे कसून तपास करत तालुका मुदखेड येथील कृष्णा धोंडीबा पवार (वय 28) आणि नांदेडच्या मारवाड गल्ली भागातील हरीश मनोज बाहेती (वय 28) या दोघांना आज दि. 4 जून रोजी अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखा आणि विमानतळ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय बियाणी हत्या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा एसआयटीचे प्रमुख विजय कबाडे, निलेश मोरे यांनी याकामी परिश्रम घेत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
