Monday, October 14, 2024

सर्वदूर पाऊस: जायकवाडीचे 18 दरवाजे उघडण्यात आल्यानंतर विष्णूपुरीचेही 4 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना इशारा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लिंबोटी प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडले

नांदेड- जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आल्यानंतर, विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. लोहा तालुक्यातील लिंबोटी प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी आणि मन्याड नदीला यामुळे मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने  मागच्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. यामुळे माना टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसांमुळे जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यात नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पाचे चार तर जिल्ह्यातील लिंबोटीचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. जवळपास वीस दिवस पाऊस झाला नाही. परिणामी शेतातील अतिवृष्टीतून बचावलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरूवात केली होती. काही ठिकाणी खडकाळ व हलक्या दर्जांच्या जमीनी आहेत अशा ठिकाणचे तर पिकं चक्क करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. मागच्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, गुरुवार दि. 8 सप्टेंबरपासून सायंकाळीच जिल्ह्यात अनेक भागात जोराच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर सलग तीन दिवस म्हणजे रविवार दुपारपर्यंत संततधार पाऊस कायम होती. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी उघडीप असा खेळ मागील चार दिवसांपासून सुरु आहे. या पावसांमुळे करपू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, पुन्हा एकदा ही पिक बहरताना दिसत आहेत.

ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले

माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर भागात पावसाचा चांगला जोर होता. या पावसाने काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने दुपारनंतर थोडी विश्रांती घेतली होती, मात्र दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. आणखी दोन दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडूंब
मागच्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सदृष्य पावसाने जिल्ह्यातील महत्वाचे पाणी प्रकल्प, सिंचन तलाव, बंधारे, नदी, नाले, ओढे, शेततळे, विहिरी भरत आले होते. त्यानंतर मात्र जवळपास पावसाने वीस दिवसाचा खंड पडल्याने पाणी पातळी खाली गेली होती. आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होवून बहुतांश पाणी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.

विष्णुपुरी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने भरला असून, रविवारी या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. शनिवारी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते तर रविवारी सकाळी ११.१५ वाजता या प्रकल्पाचा चौथा दरवाजा उघडण्यात आला. या चारही दरवाज्यातून जवळपास ५५ हजार ७९६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरा महत्वाचा प्रकल्प असलेल्या लिंबोटीतही पाणीसाठा भरपुर झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, या दोन दरवाज्यातून ६६८ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!