ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ मुंबई- राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने अपमान होत असल्याच्या कारणांवरून महाविकास आघाडी उद्या शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या मोर्चाच्या परवानगीवरून गेल्या दोन दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परंतु मुंबई पोलिसांनी आता परवानगी दिली असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्याच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. सीआरपीएफच्या जवानांचा अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात येणार आहे.
पण यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे या मोर्चात सहभागी होणार नसल्याची बाब पुढे आली आहे. उध्दव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच दिग्गज नेते या मोर्चाच्या जय्यत तयारीत असतानाच अशोक चव्हाण हे या मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खुद्द अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी जोरदारपणे सुरू झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात झालेल्या एका भेटीमुळे तर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला मोठे उधान आले होते. मात्र आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे नंतर अशोक चव्हाण यांनी वारंवार स्पष्ट केले होते. त्यातच आता महाविकास आघाडीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मोर्चाला अशोक चव्हाण हे अनुपस्थित राहणार असल्याने पुन्हा तर्कवितर्कांना सुरुवात होणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻