Saturday, July 27, 2024

सावधान: वैयक्तिक मोबाईलवरून कसुरदार वाहनाचा फोटो काढाल तर दंडात्मक कारवाई; वाहतूक पोलिसांनाच इशारा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक, नो पार्किंगमध्ये थांबलेली किंवा वाहतूक नियम  तोडणारी वाहने यांचे फोटो काढण्यासाठी व त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे ई- चलान मशीन देण्यात आलेली आहे. परंतु या मशीनचा वापर न करता शहर वाहतूक शाखेचे अनेक पोलीस कर्मचारी सर्रास स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलचा वापर करत कसूरदार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. परंतु ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी थेट एक आदेश पारित केला असून पोलिसांनी यापुढे आपल्या मोबाईलवरून कसूरदार वाहनांचा फोटो काढला तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा आदेश दिला आहे. 

कसूरदार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या (खासगी) मोबाईलचा वापर न करता ई- चलान मशीनद्वारे सर्व कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी घ्यावी. या आशयाचे पत्र क्रमांक अपोमसं ( वा )/ 44 / वाचक/ ई- चलान/ 343/ 2022 दिनांक दोन मार्च 2020 अन्वये सर्व घटकप्रमुख, नोडल अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. मात्र पोलीस घटकातील काही पोलीस अधिकारी, अंमलदार हे कसूरदार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतः च्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो, चित्रीकरण करून काही कालावधीनंतर त्याला ई- चलान मशीनमध्ये अपलोड करतात. तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचा फोटो टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणे अशक्य होते. अशा आशयाच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या.

यावरून कसूरदार वाहन चालकावर कारवाई करत असताना फोटो, चित्रीकरण करण्याकरिता स्वतःचा मोबाईल वापर न करता फक्त ई-चलान मशीनचा वापर करावा तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्याकडील ई-चलान मशीन बाबत काही समस्या, अडचणी असल्यास नेमून दिलेल्या मे. क्रिस इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून निवारण करून घ्यावे. ई- चलान कारवाई करण्याकरिता जे पोलीस अधिकारी, अंमलदार स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.

त्यामुळे आता वाहतूक पोलिसांना मोबाईलवर फोटो काढता येणार नसून ई- चलान मशीन सतत कार्यरत ठेवावी लागणार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!