ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– किनवट तालुक्यातील रिठा तांडा येथील एका युवकास सोन्याचे कॉइन दाखवून माझ्याकडे अजून क्वाईन आहेत. ते स्वस्तात विकायचे आहेत, अस विश्वास देत आमिष दाखवून त्याची चार लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार किनवट तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील रिठा तांडा येथे राहणारा दिनेश दत्ता राठोड (वय २५) याच्याशी चार अनोळखी लोकांनी आधी ओळख वाढवली. त्यानंतर एके दिवशी त्याला त्यांच्याजवळ असलेला सोन्याचा शिक्का दाखवला, आणि असे भरपूर शिक्के आमच्याकडे आहेत; आम्ही यापूर्वी अनेकांना हे शिक्के बविकून श्रीमंत केले आहे, तुलाही श्रीमंत व्हायचे असेल तर सांग असे आमिष त्यास दाखविले. आमच्याकडील सोन्याचे शिक्के तुला स्वस्तात पाहिजे असतील तर चार लाख रुपये घेऊन ये असे म्हणून त्याला विश्वासात घेतले, आणि हा प्रकार कुणाला सांगू नको असेही त्यास सांगितले.
लवकर श्रीमंत होण्याच्या अमिषापायी दिनेश दत्ता राठोड याने आपल्या एका नातेवाईकांसोबत चार लाख रुपये घेऊन त्याला बोलावण्यात आलेल्या धानोरा फाटा मुख्य रस्ता याठिकाणी तो पोहोचला. यावेळी तिथे अनोळखी तीन भामटे त्यांच्यासोबत होते. ते गेल्यानंतर चार लाख रुपये घेऊन बाजूला बसलेल्या मित्राकडे ठेवलेले शिक्के घेऊन येतो असे म्हणून या भामट्यांनी पोबारा केला. त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. अखेर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेश दत्ता राठोड याने किनवट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
त्याच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी अनोळखी चार भामट्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. डी. राठोड पुढील तपास करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻