Tuesday, December 3, 2024

सोन्याच्या हव्यासापोटी अंध भावाच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण खूनाचे धक्कादायक प्रकरण: नराधम काकास 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– सोन्याच्या हव्यासापोटी अंध भावाच्या चिमुकलीवर अत्याचार करून नंतर तिचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नांदेडमध्ये घडली. या प्रकरणातील आरोपी नराधम काकास न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

शहराच्या तेहरानगर भागात राहणाऱ्या अंध असलेल्या भावाच्या सहा वर्षीय चिमुरडीला पळवून नेऊन तिच्या अंगावरील सोन्याची छोटी बाली आणि नथ काढून घेत तिच्यावर अत्याचार करीत खून करून मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 16 ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश (दुसरे) सी. व्ही. मराठे यांनी आरोपीस 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. सरकार पक्षाच्या वतीने एडवोकेट मनीकुमारी बत्तुला यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तेहरानगर परिसरातील बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या एका इमारतीमध्ये अंध-दाम्पत्य वास्तव्यास आहे. ते रेल्वेत खारेमुरे विकून आपला संसार चालवतात. त्यांना त्यांची सहा वर्षांची डोळस मुलगी होती. फिर्यादीचा भाऊ आरोपी संतोष सखाराम हट्टेकर (वय 35, राहणार पांगरी ता. अर्धापूर हल्ली मुक्काम वैभवनगर जैन मंदिराजवळ, तरोडा खुर्द नांदेड) हा 16 ऑगस्ट रोजी फिर्यादीच्या घरी आला. आणि त्याने आपल्या पुतणीला खाऊ देण्याच्या निमित्ताने सोबत पळवून नेले. त्यानंतर गोदावरी नदी काठावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचा खून केला. खून करण्यापूर्वी तिच्या कानातील सोन्याची बाली आणि नाकातील नथ त्याने काढून घेतली, जी नंतर त्याने वर्कशॉप कॉर्नर भागात असलेल्या शिवकृपा ज्वेलर्स येथे विक्री केली. त्यापैकी पोलिसांनी बाली जप्त केली असून नथ कुठे विकली याचा तपास सुरू आहे.

मुलगी हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर याप्रकरणी तपासात ही सर्व घटना उघडकीस आली. मयत चिमूरडीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरण, खून, पुरावा नष्ट करणे यासह अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगर पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी या प्रकरणात कसून तपास करत 20 ऑगस्ट रोजी आरोपी संतोष हट्टेकर याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्या संदर्भात बरीच माहिती मिळवल्यानंतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) डॉ. अश्विनी जगताप यांच्याकडे देण्यात आले. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश सी. वी. मराठे यांच्यापुढे सरकारी वकील ऍडवोकेट मनीकुमारी बत्तुला यांनी पोलीस कोठडीची गरज असल्याच्या युक्तिवादात वेगवेगळे मुद्दे मांडले. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनीही या प्रकरणात पोलिसांना चांगली मदत केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश मराठे यांनी आरोपीला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. अंध दांपत्याच्या डोळस चिमुरडीचा अशाप्रकारे बळी गेल्याच्या घटनेनंतर नांदेडमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!