ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
# खैरेंचा कायम विरोधकांसोबत सलोखा, मग मी गद्दार कसा? –काटेंचा खैरेंना सवाल
# कायम बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक म्हणून काम करत राहणार- सुभाष काटे
लातूर- जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे यांनी शिवसेनेतील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चाकूर नगर पंचायत निवडणुकीत सुभाष काटे यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गद्दार असे संबोधल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. ते तब्बल नऊ वर्षे लातूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. चंद्रकांत खैरे हे कायम विरोधकांसोबत सलोखा राखतात, मग गद्दार मी कसा? असा सवाल काटे यांनी खैरेंना केला आहे.
चाकूर नगर पंचायत निवडणुकीत काटे यांचे चिरंजीव मल्हारी काटे यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं. त्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे टाकले. अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय हा मुलाचा वैयक्तिक निर्णय होता. मात्र मी गेल्या ३५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पाईक राहून निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम केलं. तरीही मी ‘गद्दार’ कसा ? असा संतप्त सवाल सुभाष काटे यांनी केला. शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या; मात्र चंद्रकांत खैरे हे लातूर जिल्ह्यात आल्यानंतर विरोधकांसोबत कायम सलोखा ठेवतात. याशिवाय चंद्रकांत खैरे यांना कुठल्याही कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा स्वतःचा फोटो मोठा हवा असतो, असा आरोपही सुभाष काटे यांनी केला आहे.
आपण शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक म्हणूनच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या विरोधात कट करणाऱ्यांना अपक्ष म्हणूनच धडा शिकवेन असा ईशाराही सुभाष काटे यांनी दिला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻