ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शिवजयंतीसह सर्व धार्मिक उत्सवावर प्रतिबंध लावण्यात आले होते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बऱ्याच प्रमाणात प्रशासनाने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावरील प्रतिबंध हटवले. यामुळे आता दोन वर्षानंतर शिवजयंती सार्वत्रिकपणे उत्साहात साजरी करण्यात येत असून शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण ओसंडून वाहताना दिसत आहे.
नांदेड शहर सर्वत्र शिवमय व भगवेमय झाले आहे. मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे कट आउट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी नांदेड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात रक्तदान शिबिर, अन्नदान, व्याख्यान, मिरवणुका यासह आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सकाळपासूनच सुरू झाले आहे.
दुपारी चारनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैल चित्रांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज आहे. स्वतः पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोठ्या प्रमाणात जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या वतीने ड्रोनच्या सहाय्याने सर्व हालचाली टीपल्या जात आहेत.
सकाळपासूनच छत्रपतींच्या मावळ्यांचा उत्साह वाढताना पहावयास मिळत आहे. दुचाकी रॅली, भगवे झेंडे हातात घेऊन छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याकडे जाताना दिसत होते.
शनिवारी सकाळीच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, भाजपचे प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, प्रणिता देवरे, चैतन्यबापू देशमुख, डॉक्टर शितल भालके, प्रजासत्ताक पार्टीचे सुरेश गायकवाड, पी. एस. गवळे, प्राध्यापक मनोहरे, राहुल गायकवाड, नंदकुमार बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हरीहरराव भोसीकर, भगवानराव पाटील आलेगावकर, वसंत सुगावे, उपमहापौर अब्दुल गफार, सत्यपाल सावंत, पप्पू कोंडेकर, संगीता डक, आनंद चव्हाण, किशोर स्वामी, सतीश देशमुख, रमेश कोकाटे पाटील, माधव पावडे, शाम कोकाटे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी सविता बिर्गे यांच्यासह अनेकांनी अभिवादन केले.
शिवभक्तांना मिरवणुकीदरम्यान थंड पाण्याची व्यवस्था, अन्नदान आणि काही ठिकाणी फळांचे वाटप काही सामाजिक संस्था करीत आहेत. मिरवणुकीदरम्यान शहरातील काही मुख्य मार्गावरील वाहतूक वळविण्यात आले असून शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण पसरले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻