ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची रुग्णालयास भेट
नांदेड– येथील विष्णुपुरीस्थित शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती समजताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे.
ठाण्यातील महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दोन महिन्यापूर्वी 18 रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या विष्णुपुरी भागात असलेल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागतात. प्रशासनात परस्पर ताळमेळ नसल्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होते. वर्षभरापूर्वीच एका रुग्णाचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या बाहेर मृत्तावस्थेत आढळल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. ती चौकशी अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच गेल्या 24 तासात या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात 12 नवजात अर्भक असून पुरुष व स्त्री जातीची प्रत्येकी सहा रुग्ण आहेत, तर अन्य 12 रुग्ण आहेत.
एकूण 24 जणांचा 24 तासात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या रुग्णालयात जिल्हाभरासह शेजारच्या जिल्ह्यातूनही रुग्ण दाखल होतात. परंतु या ठिकाणी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 12 बाल रुग्णांव्यतिरिक्त अन्य 12 रुग्ण हे विषबाधा आणि सर्पदंशामुळे दाखल झाली होती अशी माहिती आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे यांनी सांगितले की, विदर्भ, तेलंगणा व मराठवाड्यातून या ठिकाणी रुग्ण येतात. त्यातील अनेक रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. गेल्या काही दिवसापासून हाफकिन या औषध पुरविणाऱ्या संस्थेने काही तांत्रिक अडचणीमुळे औषधींचा पुरवठा बंद केला आहे. अशाही परिस्थितीत उपलब्ध असलेल्या व्यवस्थेत काही वेळा बाहेरून औषधी आणून तात्काळ उपचार केले जातात. रुग्ण दगावल्याची बातमी खरी असून याबाबत आपण तातडीने बैठक घेऊन आढावा व प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्प दंशने व विषबाधा या गंभीर रुग्णांसाठी हवी असलेली औषधी सध्या शासकीय रुग्णालयात नसल्याने त्याचा तुटवडा भासत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाला चांगले धारेवर धरले असून प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे.
घटना दुर्दैवी; रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ वाढवावे – खा. चिखलीकर
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने मोठ्या उद्देशाने विष्णुपुरी येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चौकशी होईलही, परंतु या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता येथे पुरेसा औषधी साठा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम टिमसह दर्जा आणि सुविधांची वाढ होणे आवश्यक आहे, असे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
खा. चिखलीकर यांची याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तज्ज्ञ डॉक्टरांची टिम पाठविली आहे. अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की, या रुग्णालयात दररोज 5 ते 6 रुग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतात. गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होतांना अगोदरच अत्यावस्थ असतात. त्यामुळे त्यांच्या आजारावरील धोका वाढलेला असतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. मागील 4 ते 5 दिवसांपासून सलग सुट्या असल्यामुळे नांदेड आणि आसपासच्या ठिकाणचे डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये अतिगंभीर रुग्णांना दाखल होता आले नाही. मागील 3 दिवसात जे जास्त संख्येने मृत्यू झाले, त्यांच्या आजाराची कारणे वेगवेगळी आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अथवा औषधीच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही, असे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी खा. चिखलीकर यांना सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामधील सुविधा, औषधीसाठा दर्जा आणि तज्ञ डॉक्टरांच्या मनुष्यबळांची संख्या वाढविली पाहिली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली असून मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडेही हा विषय मांडणार असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.
डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालयातील 24 जणांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
– आ. बालाजी कल्याणकर यांची माहिती
विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मागणीवरून या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती नांदेड उत्तर मतदारसंघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी दिली.
आ. कल्याणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. असे असले तरी, रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्या त्रुटींमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे अथवा रुग्ण अतिगंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला असेल, अशा बाबींचाही सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. भविष्यात या रुग्णालयात अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आल्याचे आ. कल्याणकर यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻