Sunday, May 19, 2024

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई- गान कोकीळा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी लढाई सुरू होती. काल शनिवारपासून त्यांची तब्येत अधिकच बिघडण्यास सुरुवात झाली होती. लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 वर्षे निधन झाले.

लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच त्यांना आयसीयू मधून बाहेर काढल्याचे देखील समजलं होत. त्यानंतर  कालपासून त्यांची तब्येत अचानक पुन्हा बिघडली होती. अखेर आज त्यांची प्राणजोत मालवली.

कोरोनाच्या काळात लता दीदी दोन वर्ष कोणाचीही गाठभेट घेत नव्हत्या, त्या घरातच होत्या. तरीही त्यांना कोरोनाने कसं घेरलं असा सवाल अनेकांना पडला आहे. लता मंगेशकर यांचं वय जास्त असल्याने त्या मागील दोन वर्षांपासून कोरोनच्या प्रसारामुळे लोकांना भेटणं टाळत होत्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं निमित्त ठरलं घरातल्या एका मदतनीसाला झालेली कोरोनाची लागण. कोरोनाच्या दोन्ही लाटेत मंगेशकर कुटुंबियांना त्रास झाला नाही. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच्या नव्या लाटेने अक्षरशः थैमान घातलं होतं. त्याच वेळी मंगेशकर कुटुंबीयांच्या घरी काम करणाऱ्या स्टाफपैकी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरगुती गोष्टी खरेदी करण्यासाठी घरातली नोकरमंडळी, मदतनीस, स्टाफ मेंबर्स बाहेर जात असतात, त्यापैकी एकीचा लता मंगेशकर यांच्याशी संपर्क आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसात त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गेले 27 दिवस लतादीदींवर या रुग्णालयात उपचार सुरू होते. नोव्हेंबर 2019 पासून लतादीदी घराबाहेर पडलेल्या नव्हत्या. त्या घरीच आराम करत असत. त्या फार कुणाशी गाठभेटही घेत नसत. त्याच सुमारास त्यांना एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी तब्बल 28 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्या आजारपणातून लतादीदी सुखरूप घरी आल्या. त्यानंतर जगभरात कोरोनाची साथ सुरू झाली आणि दीदींनी घरातच राहणं पसंत केलं होतं.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला होता. जन्माच्यावेळी लताचे नाव हेमा ठेवण्यात आले होते. नंतर ते बदलून लता करण्यात आले. त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकरांना त्यांच्या ‘भावबंध’ या नाटकातील लतिका या व्यक्तिरेखेवरून लता हे नाव सूचले होते. पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. लता मंगेशकर यांनी सुमारे सहा दशके संगीतसेवा केली आहे. त्यांनी ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये चित्रपट आणि चित्रपटाखेरीज गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांनी ९०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत एक पार्श्वगायिका म्हणूनच त्यांची ओळख राहिली. त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर आणि बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनीही संगीत हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन ठरवून सांगितीक सेवा केली आहे.

लता मंगेशकरांचा जन्म इंदूरमध्ये झालेला असला तरी त्यांचे पालनपोषण महाराष्ट्रातच झाले. लता मंगेशकर बालपणापासून गायिका बनू इच्छित होत्या. लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘किती हसाल?’ चित्रपटात गाणे गायले होते. लता मंगेशकर यांनी चित्रपटासाठी गाणी गाऊ नये, असे त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर यांना वाटत होते. त्यामुळे हे गाणे चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. परंतु लता मंगेशकर यांच्या गायन प्रतिभेमुळे जोगळेकर प्रचंड प्रभावित झाले होते.

१९४२ मध्ये लता मंगेशकर यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी १३ वर्षीय लता यांच्यावर येऊन पडली होती. नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक आणि मंगेशकर कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी गायिका आणि अभिनेत्री म्हणून करिअर घडवण्यात लता मंगेशकर यांना मदत केली.

लता मंगेशकर यांना अभिनय आवडत नव्हता. परंतु पैश्याच्या अडचणीमुळे त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. मंगळा गौर (१९४२), माझे बालपण (१९४३), गजाभाऊ (१९४४), बडी मां (१९४५), जीवन यात्रा (१९४६) यासारख्या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या.

सदाशिव नेवरेकर यांनी लता मंगेशकरांना १९४२ मध्ये एका मराठी चित्रपटात गाण्याची संधी दिली. लतादीदींनी ते गाणे रेकॉर्डही केले. परंतु चित्रपटाच्या फायनल कटमधून ते गाणे हटवले गेले. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मंगळागौरमध्ये लता मंगेशकर यांचा आवाज ऐकायला मिळाला. या गीताला दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केले होते. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजाभाऊ’ या मराठी चित्रपटात लता मंगेशकर यांनी ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू.’ हे हिंदी गाणे गायले होते.

१९४५ मध्ये लता मंगेशकर मुंबईत शिफ्ट झाल्या आणि त्यांचे करिअर आकार घेऊ लागले. मुंबईत त्यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरूवात केली. १९४५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडी मां’ चित्रपटात लताने गायलेले भजन ‘मां तेरे चरणों में’ आणि १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आपली सेवा में’ चित्रपटात लतांनी गायलेले गाणे ‘पा लागूं कर जोरी.’ ने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

१९४९ मध्ये ‘महल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. खेमचंद प्रकाश यांनी लताकडून ‘आएगा आने वाला..’ हे गीत या चित्रपटासाठी गाऊन घेतले होते. ते मधुबालावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे सुपरहिट ठरले. ह गीत लता मंगेशकरांच्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक मानले जाते आणि आजही ते ऐकले जाते. या गीताच्या सफलतेनंतर लता मंगेशकर यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.

लता मंगेशकरांना उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी १९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३ आणि १९९४ चा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. १९७२, १९७५ आणि १९९० चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांनी पटकावले. १९६९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. १९७४ मध्ये जगातील सर्वाधिक गीते गायल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावे झाली होती. त्यांनी १९८९ चा दादासाहेब फाळके पुरस्कारही पटकावला. १९९३ चा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. १९९९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. २००१ मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना जाहीर झाला. याच वर्षी महाराष्ट्र सरकारनेही ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना गौरव केला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!