ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लोहा (जि. नांदेड)- विविध गौण खनिजाच्या तस्करीसाठी विना नंबरची टिप्पर, हायवा अशी वाहने वापरण्याचे प्रकार लोहा तालुक्यात सुरू झाले आहेत. तस्करी करताना वाहनांवरील कारवाईपासून वाचण्यासाठी वाळू-मुरूम माफियांची ही नवीन शक्कल शोधून काढल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळा सुरू झाला तसा अनधिकृतरीत्या गौण खनिज उत्खनन करण्याचा गोरखधंदा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू, मुरूम, माती आदींची टिप्पर, हायवा या वाहनांद्वारे दिवसरात्र वाहतूक होत आहे. सदरील वाहतूक करणारे टीप्पर, हायवा महसूल व पोलीस प्रशासनाने अडवू नये आणि अडविलेच तर दंड लागू नये आणि गुन्हाही दाखल होऊ नये म्हणून मुख्य महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा, टिप्परवर असलेले नंबर खोडून टाकण्याचा प्रकार वाहन मालकांकडून करण्यात येत आहे.
लोहा तालुक्यातील भारसवाडा, अंतेश्र्वर, पेनुर, शेवडी (बा), कपिलेश्वर सांगवी, बेटसांगवी, येळी, हतनी, कौडगाव आदी शिवारातून गोदावरी नदी वाहते. तसेच अन्य छोट्या मोठ्या नद्या देखील वाहतात. वाळू माफिया व माती माफिया या नदी पात्रातून बेसुमार वाळू व मातीचे अवैधरित्या उत्खनन करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल तर बुडवत आहेत. आणि आता सदर माफियांच्या मालकीचे अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे टीप्पर हे महसूल विभाग, पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाकडून पकडण्यात येवू नये म्हणून त्यावरील नंबरच्या पाट्या खोडून नंबर गायब करण्यात येत आहेत. प्रशासनाची नजर चुकवून कारवाई टाळण्यासाठी भरधाव वेगाने धावणाऱ्या टीप्परमुळे अपघातासारखी अप्रिय घटना घडू शकते आणि घडल्यास गुन्ह्यात टिप्पर निष्पन्न होऊ शकणार नसल्याने कारवाई करावी तर कोणत्या टिप्परवर असा प्रश्न निर्माण व्हावा म्हणून हे प्रकार केले जात आहेत.
प्रारंभी महसूल प्रशासनाकडून अनाधिकृतरीत्या रेती, माती वाहतूक करणाऱ्या टिप्पर आदी वाहनांवर कधी कारवाई झालीच तर त्यांच्या खोडण्यात आलेल्या क्रमांकाची चौकशी करण्यात येत नाही. केवळ कमी- अधिक प्रमाणात दंड आकारण्यात येतो. इतर विभागही केवळ बघ्याची भूमिका घेतात. नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या मनात आले तर एखाद्या वेळी महामार्गावरून फेरफटका मारून एखादे टीप्पर अगदीच समोर दिसले तर दंडाची आकारणी केली जाते. मात्र विनानंबर वाहनांबद्दल मात्र कुठलीही कारवाई केल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही.
प्रशासनाने सदर गंभीर बाबीकडे लक्ष देवून ठोस कारवाई करावी अशी मागणी नदी काठावरील तसेच महामार्गावरील गावातील सर्वसामान्य नागरिकांतुन होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻