ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- मोबाईलच्या देवाण- घेवाणीवरुन दोन भावांमध्ये वाद झाला. भांवडांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथे रविवार दि. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवार, दि. २६ जून रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन राजू गवळे (वय २०) असं मृताचे नाव आहे.
नांदेड शहराला अगदी लागूनच काही अंतरावर गोपाळचावडी हे छोटे गाव आहे. गावातील रहिवासी करण राजू गवळे आणि त्याचा छोटा भाऊ अर्जुन राजू गवळे या दोन भावंडांमध्ये रविवार दि. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलमुळे वाद झाला होता. लहान भाऊ अर्जुनने करणकडे मोबाईल वापरण्याकरिता मागितला. मात्र, करणने मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून दोघा भावांमध्ये जोरदार भांडणं झाली. भांडण विकोपाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. यातच लहान भावाने मारहाण केल्याचा राग अनावर झालेल्या करणने २० वर्षीय अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला.
याप्रकरणी लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठ्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी भेट दिली.
मोबाईल देण्या- घेण्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरुन घडलेल्या या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला असून मोबाईलचा अतिवापर किंवा अतिवापराची इच्छाच एकप्रकारे जीवावर उठल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻