ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार (वय ७२) यांचा सोलापूर- पुणे हायवेवर अपघातात मृत्यू झाला. सोलापूरजवळ मोहोळ नजीक माळवत- चिखली पाटी परिसरात एक जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कार ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाबाराव एंबडवार हे पुण्याला आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेले होते.
पुणे- सोलापूर हायवेवर माळवत- चिखली या गावाजवळ शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात बाबाराव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर जवळपास दीड तास त्यांना मदत मिळू शकली नाही. नंतर मोहोळ पोलीस व महामार्ग पोलिसांनी अथक परिश्रम घेत क्रेनच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढला.
या अपघातात त्यांच्या चालक करीम खान पठाण व रामचंद्र मोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे बारा वर्षे सभापती, बिलोली पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती ते शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषदेचे दोन वेळेस अध्यक्षपद असा त्यांचा राजकीय प्रवास होता. तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून ते पाच वेळा सदस्य म्हणून निवडून आले. तसेच एक वेळेस आरळी जिल्हा परिषदमधून बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले होते. चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कोल्हे बोरगांव, तालुका बिलोली येथे आज रविवार, दि. २ जुलै रोजी रोजी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻