ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ नागपूर – राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. शेजारील परभणी आणि लातूर जिल्ह्याला मात्र मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व मिळाले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊच्या नऊ विधानसभा मतदार संघात सत्ताधारी पक्षांचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला किमान एक तरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीच्या पक्षांतील आमदार नांदेड जिल्ह्यातून निवडून आलेले असल्याने यातील अनेकांची नावे मंत्री पदासाठी चर्चिली जात होती. मात्र, यातील एकालाही संधी मिळाली नसल्याने नांदेड जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला आहे.
हेमंत पाटील, चिखलीकर, राठोड यांची चर्चा
शिवसेनेकडून माजी खासदार तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. यापूर्वी विधानसभेत आमदार म्हणून केलेले काम त्यानंतर खासदारकी आणि आता पुन्हा आमदारकी या सीनियारिटीनुसार त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यातच आमदार हेमंत पाटील यांनी नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, हदगाव, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या चार जागांवर शिवसेनेला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. ही कारणंही त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी पूरक अशी होती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची वर्णी लागेल अशी दाट शक्यता व्यक्त होत होती. आमदार चिखलीकर यांची आमदारकीची तिसरी टर्म, त्याचबरोबर खासदारकीचाही पाच वर्षांचा अनुभव, या मोठ्या अनुभवाच्या जोरावर आमदार चिखलीकर यांना यावेळी मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती.
भाजपकडून मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रीपद दिले जाणार अशी चर्चा होत होती. त्यांची आमदारकीची तिसरी टर्म आणि जातीय समीकरणे पाहता त्यांचा नंबर लागेल असे बोलले जात होते. शिवसेनेकडून बंजारा समाजातील संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊन त्या ऐवजी भाजपकडून डॉ. तुषार राठोड यांना संधी दिली जाईल असेही सांगितले जात होते. मात्र या तिन्ही नावांपैकी एकालाही मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही.
नांदेड जिल्हा मंत्र्याविना
नांदेड जिल्ह्याने तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात मोठी मंत्री पदही नांदेड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली आहेत. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड जिल्ह्याला स्थान मिळालेले नसल्याने नांदेड जिल्हा मंत्र्याविना राहिला आहे.
परभणी जिल्ह्याला अनेक वर्षांनी मिळाली संधी
नांदेड शेजारील परभणी जिल्हा हा तसा सातत्याने मंत्रीपदापासून वंचित राहणारा जिल्हा राहिला आहे. मात्र यावेळी परभणी जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले असून जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात मंत्रिपदाचा चेहरा बदलला
नांदेडप्रमाणेच शेजारील लातूर जिल्हा ही सातत्याने मंत्रिमंडळात स्थान मिळविणारा जिल्हा राहिलेला आहे. यावेळीही लातूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले असून चेहरा मात्र बदलला आहे. मागील पाच वर्षात आधी अमित देशमुख आणि संजय बनसोडे, त्याचबरोबर नंतरच्या महायुती सरकारमध्ये पुन्हा संजय बनसोडे यांनी मंत्रीपद भूषविले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लातूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले असून संजय बनसोडे यांच्या ऐवजी बाबासाहेब पाटील यांना संधी मिळाली आहे.
मराठवाड्याला केवळ सहा मंत्रिपदं
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड
पंकजा मुंडे, भाजप, बीड
अतुल सावे, भाजप, छत्रपती संभाजीनगर
संजय शिरसाट, शिवसेना, छत्रपती संभाजीनगर
मेघना बोर्डीकर, भाजप, परभणी
बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, लातूर
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻