ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ नरसी- देगलूर रस्त्यावर जबर मारहाण करून लूटमार
नांदेड– कोणत्याही महामार्गावरुन जाताना वाहनधारकांनी सतत सतर्क राहून निर्मनुष्य ठिकाणी थांबणे टाळणे गरजेचे बनले होते. कारण रस्त्यावर पडलेल्या एका जॅकच्या मोहापायी गाडी थांबवलेल्या वाहनधारकास दीड लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. नरसी- देगलूर रस्त्यावर जबर मारहाण करून लूटमार करण्यात आल्याचा हा प्रकार घडला आहे.
देगलूर तालुक्याच्या खानापूर येथील पंक्चर दुकानचालक जमीलखान अहमदखान पठाण हे आपल्या चारचाकी वाहनातून कुटुंबियांना घेऊन जात असताना त्यांना रस्त्यावर एक जॅक बेवारस पडलेला आढळला. चार चाकी गाडीचे चाक काढण्यासाठी उपयोगी पडणारा तो जॅक घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली असता दबा धरून बसलेल्या अनोळखी चार जणांनी चार चाकीवाहनातील महिलांसह दोघांना जबर मारहाण केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व नगदी आणि मोबाइल असा एक लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पाचशे रुपयाचा बेवारस पडलेल्या जॅकच्या मोहात पडून तब्बल दीड लाख गमावावे लागले.
ही घटना 19 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास नरसी- देगलूर रस्त्यावरील कुंचेली फाट्याजवळ घडली. खानापूर, तालुका देगलूर येथील पंक्चर दुकान चालक जमीलखान अहमदखान पठाण (वय 35) आपली पत्नी, भावजय व पुतण्यासह देगलूरहून गावाकडेकडे आपल्या चारचाकी वाहनातून जात होते. यावेळी अनोळखी चार चोरट्यांनी रस्त्यावर जॅक ठेवला आणि ते रस्त्याच्या बाजुला दबा धरून बसले; कुणी थांबले की त्याला लुटायचे असा प्लॅन त्यांनी आखलेला होता.
जमीलखान पठाण यांचे चार चाकी वाहन तेथे येताच त्यांना रस्त्यावर पडलेला बेवारस जॅक दिसला, तो उचलण्यासाठी त्यांनी आपली गाडी बाजूला उभी केली. ते खाली उतरताच चोरीच्या इराद्याने दबा धरून बसलेल्या चार जणांनी एकदम त्यांच्यावर येऊन झडप घातली. त्यांना काही कळण्याच्या आतच लुटारुंनी त्यांना आणि त्यांच्या पुतण्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीतील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पुतण्याजवळील नगदी रुपये आणि सहा मोबाईल असा एकूण एक लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लुटारुंनी जबरीने लुटून पळ काढला.
जमीलखान पठाण यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव व त्यांच्या पथकाने भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वतः विजय जाधव हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻