ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– परजिल्ह्यातील एक विद्यार्थिनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेते. तिला सिपला कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने वेबसाईटच्या माध्यमातून हजरो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला 28 जून 2022 रोजी शाईन डॉट कॉम या संगणकाच्या वेबसाईटवरून संपर्क साधण्यात आला. संगणकाचा वापर करून सिपला कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. हे आमिष दाखवून या विद्यार्थिनीकडून टप्प्याटप्प्याने एक्सीस आणि कोटक बँकेमध्ये फोन पेद्वारे पैसे भरण्यास सांगण्यात आले. नोकरीच्या आमिषापायी या तरुणीने तिच्या जवळ असलेले ८२ हजार १९० रुपये आणि काही मैत्रिणीकडून हातउसणे घेऊन फोन पेद्वारे हे पैसे भरले.
त्यानंतर काही दिवस तिने जॉब लेटरची वाट पाहिली. परंतु जॉब लेटरही नाही आणि संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही नॉट रिचेबल असल्याने तरुणी बेचैन झाली. अखेर तिने नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष करून अशा कुठल्याही कंपनीमधून शाईन डॉट कॉम अशा वेबसाईटचा वापर करून अन्य विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना फोन येत असेल तर विद्यार्थ्यांनी अशा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻