ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अंशत: तर काही रद्द ; काहींच्या मार्गामध्ये बदल, काही उशिराने धावणार
नांदेड- सिकंदराबाद येथील रेल्वे स्थानकावर जाळपोळीच्या हिंसक आंदोलनामुळे रेल्वेची सेवा काही अंशी विस्कळीत झाली आहे. यात नांदेडहून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांवरही परिणाम झाला असून आजही शिर्डी, अजिंठा एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सायंकाळी 6.50 वाजता नांदेडमध्ये येणारी ‘देवगिरी’ आजही मध्यरात्री नांदेडला येणार आहे.
तेलंगणातील सिकंदराबादमध्ये शुक्रवारी (ता.१७) रेल्वेस्थानकावर अग्निपथ योजनेच्या विरोधातील जाळपोळीच्या आंदोलनामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून काल दक्षिण मध्य विभागातून धावणार्या श्रीसाईनगर शिर्डी, अजिंठा एक्स्प्रेसह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. काही रेल्वे अंशत: रद्द, तर काही वळवण्यात आल्या होत्या. तर देवगिरी एक्सप्रेस ५ तास ४० मिनिटे उशिराने धावली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. आजही तीच स्थिती राहणार आहे.
मराठवाड्याजवळ असलेल्या सिकंदराबाद येथे संतप्त तरुणांनी शुक्रवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर उभी असलेल्या रेल्वेला आग लावण्यात आली. तसेच स्थानक परिसरात जाळपोळ करून तीव्र निषेध नोंदविला. दरम्यान, या आंदोलनामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणार्या काही रेल्वे गाड्या अंशत:, काही रद्द तर काहींच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ या नव्या सैन्य भरती योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमाव यूपीपासून बिहारपर्यंत हिंसक बनला असून रेल्वे गाड्यांना लक्ष्य करीत रेल्वे जाळण्यात येत आहेत. या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी अनेक गाड्यांना लक्ष्य केले आहे. या गोंधळामुळे देशात एकूण 200 पेक्षा अधिक रेल्वे सेवाही प्रभावित झाल्या आहेत. दुसरीकडे, सगळा प्रकार पाहता, रेल्वेने देशभरातील अनेक ट्रेन सेवा रद्द केल्या आहेत.
आजही शिर्डीसह अजिंठा एक्स्प्रेस गाडी रद्द
आज दिनांक 17 जून, 2022 ला सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या 17002 सिकंदराबाद- श्रीसाईनगर शिर्डी ही नांदेडमार्गे धावणारी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. आजही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आज दिनांक 18 जून , 2022 ला मनमाड रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या 17063 मनमाड – सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या 17001 – श्रीसाईनगर शिर्डी -सिकंदराबाद एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे.
पटना रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या 17609 पटना – पूर्णा एक्स्प्रेसही आज रद्द करण्यात आली आहे.
देवगिरी एक्स्प्रेस आजही उशिरा धावणार
सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर होत असलेल्या आंदोलनामुळे, गाडी संख्या 17058 सिकंदराबाद-मुंबई ही नांदेडमार्गे धावणारी देवगिरी एक्स्प्रेसची नियमित वेळ ही दुपारी 1.20 वाजता सुटण्याची आहे. पण आज दिनांक 17 जून , 2022 ला ही रेल्वे 340 मिनिटे उशिरा म्हणजेच सायंकाळी 7:00 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी रोज सायंकाळी 6.50 वाजता नांदेडला पोहोचते, पण आज ती रात्री 12.30 वाजता नांदेडला पोहचण्याची शक्यता आहे.
या निदर्शनामुळे रेल्वेचे किती नुकसान झाले आहे हे सध्या सांगणे कठीण असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वेच्या तीन चालत्या गाड्यांचे डबे या हिंसेत खराब झाले आहेत. त्याचवेळी आज सकाळी बिहारमधील समस्तीपूर आणि लखीसरायमध्ये रेल्वेला आग लावण्यात आली. अनेक एसी डब्यांनाही आग लागली.
ट्रेन थांबल्या
सैन्य भरतीसाठी आणलेल्या नवीन योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी आज विविध मार्गावरील गाड्या रोखल्या. अनेक ठिकाणी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली.
उग्र निदर्शनामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची वाट पाहण्यात त्रास होत आहे. याशिवाय देशभरात अनेक रेल्वे गाड्या त्या- त्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.
गोळीबारात एकाचा मृत्यू
‘अग्निपथ योजने’ विरोधात सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनत चालले आहे. बिहारपासून तेलंगणापर्यंत लोक या योजनेला विरोध करताना दिसत आहेत. शेजारील तेलंगणातील सिकंदराबाद येथे निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻