ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ घरकुलं देण्याची मागणी
◆ प्रशासनाची उडाली तारांबळ
नांदेड– मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व चर्चेत आलेल्या बॉम्बशोधक व नाशक पथक कार्यालयासमोरील महसूल विभागाच्या इमारतींतील सदनिकांमध्ये नागरिक घुसले आहेत. ही माहिती महसूल विभागाला मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने महसूल यंत्रणेने या इमारतींमध्ये आणि त्यातील सदनिकांमध्ये घुसलेल्या नागरिकांपैकी काहींना बाहेर काढले, पण अजूनही बरेच जण आत आहेत. याठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला शासकीय घरकुलं मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि कब्जा सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. असाच घुसखोरीचा प्रकार गोवर्धनघाट येथील महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील घरकुलामध्येही झाला होता.
नांदेड महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानासाठी नवीन कौठा भागात बॉम्बशोधक व नाशक पथक कार्यालयाच्यासमोर महसूल विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जवळपास इमारती बांधुन घेतल्या, यात अनेक आहेत. मात्र या सदनिकांमध्ये मागील काही वर्षापासून राहण्यासाठी कोणीच नसल्याने हे ठिकाणी काहीकाळ दारुड्यांचा अड्डा बनली होती. एवढेच नाही तर या इमारतींमधील काही साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. तसेच उपद्रवींनी बऱ्याच साहित्याची तोडफोड करून नुकसान केले होते.
या सदनिकांना रंगरंगोटी केल्यानंतर याठिकाणी आता आपल्या हक्काच्या निवाऱ्याची मागणी करीत अनेक नागरिक या महसूल विभागाच्या इमारतींतील सदनिकामध्ये घुसले आहेत. ही बाब सोमवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी महसूल प्रशासनाला समजताच त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची मदत घेत घटनास्थळ गाठले. सदनिकांवर कब्जा मिळविलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सदनिकांमध्ये घुसलेल्या नागरिकांपैकी काहींना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असले तरी अजूनही बरेच जण आत आहेत.
विशेष म्हणजे या रिकाम्या सदनिकांमध्ये या नागरिकांना कब्जा करण्यासाठी कोणी सांगितले. या नागरिकांना त्यांची स्वतःची घरे आहेत का? त्यांना घरकुलं मंजूर झालेली आहेत का? याची चौकशी पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मंडळ अधिकारी नागमवाड, तलाठी मनोज देवणे, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी घटनास्थळी जाऊन कब्जा करणाऱ्यांना समज दिली आहे. या ठिकाणी मोठ्या पोलिस बंदोबस्तात बाहेर काढण्यासाठी एक तास अवधी लागला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻