ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते देशातील पहिल्या महिला मोफत सिटी बस सेवेचे उदघाटन
लातूर- लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरविणारी देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे. लातूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्यावतीने महिलांना मोफत बस सेवा देण्याच्या या सेवेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथून पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाला.
महिलांना अत्यंत सुरक्षित सेवा देणारी ही योजना अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते दिपक सूळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमन मित्तल, माजी महापौर स्मिता खानापुरे, ज्येष्ठ नगर सेवक रविशंकर जाधव, महापालिका परिवहन समितीचे सदस्य, इतर नगरसेवक उपस्थित होते.
या सेवेविषयी बोलताना ना. अमित देशमुख म्हणाले की, महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी मोफत बस ही योजना अत्यंत योग्य काळात सुरु होत आहे. कोविडच्या एका पाठोपाठ एक अशा तीन लाटा आल्या. त्यामुळे पूर्ण क्षमतेनी कोणतीच गोष्ट करता आली नाही. आता मात्र, सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. त्यामुळे या बसचा महिलांना चांगला फायदा होईल.
स्मार्ट कार्ड, एक महिला कर्मचारी
या बससाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल, तसेच या बसमध्ये एक कर्मचारी महिला असेल. तसेच या बससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन होईल. घरात आई आहे, वडील कामावर गेले, क्लास सोडायला कोणी नाही असे आता मुलीला वाटणार नाही. ती या बसमध्ये अत्यंत सुरक्षित प्रवास करेल, तिचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे शैक्षणिक नगरी आहे, इथे सुरक्षितता आहे म्हणून हजारो विद्यार्थी इथे शिकायला येतात या नावलौकिकात या बसचा आता समावेश होईल असे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पीएमपीने २०१८ मध्ये महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू केली होती. दर महिन्याच्या आठ तारखेला मोफत प्रवास देण्याचे ही ठरविण्यात आले होते. पण कोरोनामुळे ही सेवा बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये सुरू झालेली महिलांसाठीची ही मोफत बसेवेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻