ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- सुमारे साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या येथील महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार बालाजी जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. केवळ 3 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील असलेल्या बालाजी जाधव यांच्या पराभवाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत करत अखेर मला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
२०१७ मध्ये नांदेड वाघाळा शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सांगवी प्रभाग क्र. ३ (ड) मधील निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार बालाजी जाधव यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला होता. या निर्णयाविरूद्ध बालाजी जाधव यांनी नांदेड येथील दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. तब्बल साडेचार वर्षानंतर याबाबत न्यायालयाने आज निकाल घोषित करून जाधव यांना विजयी घोषित केले. तर सरदार संदिपसिंग गाडीवाले यांचे सदस्यत्व रद्द ठरवले आहे.
या धक्कादायक पराभवानंतर बालाजी जाधव यांना काँग्रेसने महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली, सध्या स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात संदिपसिंग गाडीवाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती, त्यात त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.
जाधव यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर बालाजी जाधव यांनी निवडणुकीतील प्रक्रिया व मतांबाबतचे अनेक आक्षेप असे सर्व पुरावे गोळा करून या निकालाविरोधात नांदेडच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. उपलब्ध पुराव्याआधारे दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला, त्यानंतर जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. जाधव यांच्याकडून अॅड. अनिकेत भक्कड यांनी बाजू मांडली.
निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान अधिकाऱ्यांनी चार मते अवैध ठरविली होती. त्यात मतपत्रिकेवर स्वतः जाधव यांच्या नावापुढे फुली मारलेल्या एका मतासह तीन टपाली मते बॅलेटपेपर फाटल्याचे कारण देऊन अवैध ठरविण्यात आली होती. यासह मतदानाची वेळ संपल्यानंतर संबंधित मतदान केंद्रावर रांगेत असलेल्या लोकांचे मतदान करून घेण्यात आल्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता. त्यानंतर एव्हीएम मशिन बंद असल्याने दुसरी इव्हीएम मशिन बसवून रांगेत नसलेल्या लोकांचेही मतदान करून घेण्यात आले, असे आक्षेप मांडण्यात आले.
या सर्व आक्षेपावर आणि इतर उपलब्ध साक्षीपुराव्यानंतर ही मते वैध ठरवून याचिकाकर्ते बालाजी जाधव यांना दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पाटील यांनी निवडून आल्याचे घोषित केले. तर विरोधी अपक्ष उमेदवार संदिपसिंग गाडीवाले यांचे सदस्यत्व रद्द ठरवले आहे. हा निकाल बुधवारी न्या. पाटील यांनी जाहीर केला. या निर्णयाचे बालाजी जाधव यांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻