ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ चक्क ईडी च्या नावे बनावट पत्र
◆ माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांना आलेले ‘ते’ पत्र बनावट
नांदेड- महापालिकेचे माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांना आलेले ईडी कार्यालयाच्या नावे आलेले पत्र हे बनावट असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्र पाठविण्याचा उद्देश व पत्र कोणी पाठवले? याचा तपास इतवारा पोलीस करत आहेत. यामुळे शमीम अब्दुल्ला यांना तर दिलासा मिळालाच आहे, पण याचबरोबर महापालिकेतील अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नांदेड महानगरपालिकेअंतर्गत गुंठेवारी प्रकरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. हे प्रकरण थेट सक्त वसुली संचालनालया (ईडी) कडे गेल्याने अनेकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. काहींनी या प्रकरणात आप-आपला खुलासा केला आहे. नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या गुंठेवारी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. यात एक कर्मचारी निलंबित करून काही कंत्राटी अभियंत्याविरुद्ध व मालमत्ताधारकाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा वजिराबाद पोलिसांकडून तपास सुरू असतानाच अचानक मुंबई येथील सक्त वसुली संचालनालयाचे अधिकारी धडकले आणि हा प्रकार ईडीकडे गेला. या प्रकरणातील जवळपास साडेसहा हजार प्रस्ताव (फायली) तपासल्या. त्यातील काही फायली बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या विभागाचे प्रमुख, अभियंते व काही कर्मचारी यांचेही जबाब नोंदविले.
हे प्रकरण गंभीर वळण घेत असतानाच अचानक महापालिकेचे माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांना (Fno-Ecir/841/muzo-1/2023/AD/RV ) एक पत्र आले. त्या पत्रावर ईडी विभागाचे जॉईन्ट सेक्रेटरी निखीलकुमार गोबिला यांची स्वाक्षरी असून त्यांनी त्यांच्या अधिकारांत दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अब्दुल शमीम अब्दुल्ला यांना मुंबई येथील ईडी झोन कार्यालय एक येथे हजर राहण्याचे आदेश दिल्याचे पत्र आले. या पत्रामुळे त्यांच्यासह अनेकांची भंबेरी उडाली. विशेष म्हणजे आलेले हे पत्र बनावट आहे किंवा खरे आहे याबद्दल साशंकता सुरू झाली. हे पत्र बनावट असल्याची शंका आल्याने शमीम अब्दुल्ला यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर इतवारा पोलिसांकडून याची पडताळणी सुरू करण्यात आली होती. आता चौकशीअंती हे आलेले पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या पत्रासंदर्भात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पत्राची चौकशी केली. त्यानंतर हे पत्र मुद्दाम म्हणून अब्दुल शमीम यांना त्रास देणे व बदनामी करण्याचा उद्देश समोर ठेवून पाठवल्याचे आता दिसून येत आहे.
याप्रकरणी अब्दुल शमीम अब्दुल्ला (वय ५६) रा. मदिना नगर, देगलूर नाका नांदेड यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादविच्या कलम ४६८, ४६९, ४७१, ४७२ आणि ५०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रहीम चौधरी करत आहेत. महापालिकेतील अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻